पुणे विमानतळावर बॅगेच्या वजनानेच वाढला संशय; तपासणी करताच उलगडलं कोट्यवधींचं गुपित…

पुणे : पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरक्षा तपासणीदरम्यान तब्बल १.७ किलो सोन्याचे दागिने जप्त करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या दागिन्यांची बाजारमूल्य सुमारे १.९ कोटी रुपये असल्याची माहिती समोर आली आहे. ही कारवाई गुरुवारी रात्री प्री-एम्बार्केशन सुरक्षा तपासणीदरम्यान करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, राशपाल सिंग हे पुण्याहून अमृतसरला जाणाऱ्या विमानाने प्रवास करत होते. नेहमीप्रमाणे त्यांच्या हँडबॅगची सुरक्षा तपासणी सुरू असताना केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (CISF) जवानांना बॅगेतील एका जड वस्तूचा संशय आला. बॅगची तपासणी केली असता त्यामध्ये तब्बल १.७ किलो वजनाचे सोन्याचे दागिने आढळून आले.

यानंतर विमानतळ प्रशासनाने संबंधित प्रवाशाची सखोल चौकशी केली. चौकशीदरम्यान राशपाल सिंग यांनी आपण अमृतसरमधील ‘एम.के. ज्वेलर्स’चे मालक असल्याचे सांगितले. महाराष्ट्रातील ग्राहकांना दागिन्यांचा पुरवठा करण्यासाठी आपण नियमितपणे पुणे-अमृतसर असा प्रवास करत असल्याचा दावाही त्यांनी केला.

घटनेची माहिती तातडीने पुणे आयकर विभागाला देण्यात आली. प्राथमिक चौकशी, कागदपत्रांची पडताळणी आणि आवश्यक नोंदी पूर्ण केल्यानंतर संबंधित प्रवाशाला अमृतसरला जाण्याची परवानगी देण्यात आली.


मात्र, या प्रकरणाचा तपास अद्याप सुरू असून, सुमारे दोन कोटी रुपयांच्या सोन्याच्या व्यवहाराची संपूर्ण माहिती पुढील चौकशीसाठी अमृतसर आयकर विभागाकडे पाठवण्यात आली आहे. संबंधित व्यवहारातील कागदपत्रे, कर भरणा आणि सोन्याचा स्रोत याची सखोल चौकशी केली जाणार असून, या प्रकरणात पुढे काय निष्पन्न होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
