एकटीला पाहून नियत बदलली! लिफ्ट देतो म्हणत गाडीत बसवलं अन्…, संभाजीनगरात विवाहितेसोबत घडलं धक्कादायक कृत्य

छत्रपती संभाजीनगर : वैजापूर तालुक्यात माणुसकीला काळिमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. लिफ्ट देण्याच्या बहाण्याने एका 23 वर्षीय विवाहित महिलेचं अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशातील ही 23 वर्षीय विवाहित महिला मनमाडला जाण्यासाठी रस्त्यावर वाहनाची वाट पाहत उभी होती. त्यावेळी दोन्ही आरोपींनी तिला लिफ्ट देण्याचे आमिष दाखवून वाहनात बसवले. काही अंतर गेल्यानंतर तिला निर्जनस्थळी नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे.

घटनेनंतर पीडित महिलेने तातडीने वैजापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तात्काळ गुन्हा नोंदवत तपास सुरू केला. अवघ्या काही तासांत दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली.

देवचंद भागवत आणि किरण पेटारे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून, दोघेही वैजापूर तालुक्यातील रहिवासी आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, आरोपींविरुद्ध कायद्यानुसार पुढील कारवाई करण्यात येत आहे.


