सिया-चेतनचा पहिला डाव फसला! केतन अग्रवालसाठी सुपारी किलर गाठला; अटकेपूर्वी पाहिले होते ते जपानी व्हिडिओ

पुणे : लोहगड हत्या प्रकरणाच्या तपासात रोज नवे धक्कादायक खुलासे होत असून, आता आरोपी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांनी केतन अग्रवालच्या हत्येसाठी आधी एका कॉन्ट्रॅक्ट किलरची मदत घेण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, लक्ष्य असलेल्या अग्रवाल कुटुंबाची माहिती मिळताच संबंधित व्यक्तीने हे काम स्वीकारण्यास स्पष्ट नकार दिल्याने आरोपींचा पहिला प्लॅनच कोलमडल्याचे तपासातून उघड झाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिया आणि चेतन यांनी पुण्यातील एका हॉटेलमध्ये त्या व्यक्तीची गुप्त भेट घेतली होती. या भेटीचे सीसीटीव्ही फुटेज तपास पथकाने ताब्यात घेतले असून, त्याची बारकाईने छाननी सुरू आहे. तपास अधिकाऱ्यांच्या मते, संबंधित व्यक्तीचा जबाब न्यायालयीन प्रक्रियेत अत्यंत महत्त्वाचा ठरू शकतो. आरोपींनी हत्या करण्यासाठी त्याच्याशी संपर्क साधल्याची बाब या साक्षीद्वारे अधिक स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

या प्रकरणात सायबर तपासातूनही अनेक महत्त्वाचे धागेदोरे हाती लागले आहेत. आरोपींच्या मोबाईल आणि इतर डिजिटल उपकरणांची तपासणी करताना अटक होण्यापूर्वी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांनी जवळपास दोन तास जपानी भाषेतील व्हिडिओ पाहिल्याचे समोर आले आहे. तपासानुसार, या व्हिडिओंमध्ये पोलिस चौकशीदरम्यान शांत कसे राहावे, चेहऱ्यावरील हावभाव आणि देहबोलीवर नियंत्रण कसे ठेवावे, संशय न येईल अशा पद्धतीने प्रश्नांची उत्तरे कशी द्यावीत, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले होते.

दोन्ही आरोपींच्या ब्राउझिंग हिस्ट्रीमध्ये या व्हिडिओंच्या लिंक्स आढळून आल्याने तपासाला नवे वळण मिळाले आहे. गुन्ह्यानंतर चौकशीसाठी मानसिक तयारी करण्याचा प्रयत्न झाला होता का, या दिशेनेही पोलिस तपास करत आहेत. त्याचबरोबर मोबाईलमधील चॅट्स, कॉल डिटेल्स, लोकेशन हिस्ट्री आणि इंटरनेट सर्चचा तपशीलही तपासला जात आहे.


दरम्यान, कॉन्ट्रॅक्ट किलरने नकार दिल्यानंतर आरोपींनी पुढे नेमकी कोणती योजना आखली, कोणाशी संपर्क साधला आणि हत्येपर्यंत घटनाक्रम कसा पोहोचला, याचा तपशील जोडण्याचे काम तपास यंत्रणांकडून सुरू आहे. पोलिसांकडून डिजिटल पुरावे, सीसीटीव्ही फुटेज, साक्षीदारांचे जबाब आणि फॉरेन्सिक अहवाल यांच्या आधारे संपूर्ण कटाची साखळी उलगडली जात आहे.
लोहगड हत्या प्रकरणातील या नव्या खुलाशांमुळे तपास अधिकच गंभीर व निर्णायक टप्प्यात पोहोचला असून, येत्या काही दिवसांत आणखी महत्त्वाचे पुरावे आणि धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता तपास यंत्रणांनी व्यक्त केली आहे.
