सरकारी नोकरी, संपत्तीचा हव्यास अन् आईचाच काटा काढला! ७ लाखांची सुपारी देऊन लेकीने रचला थरारक खुनाचा कट

जयपूर : राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये आई-मुलीच्या नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. सरकारी नोकरी आणि कुटुंबाची मालमत्ता मिळवण्यासाठी एका तरुणीने आपल्या सख्ख्या आईच्या हत्येचा कट रचल्याचा प्रकार उघड झाला आहे. सुरुवातीला रस्ते अपघात वाटणाऱ्या या घटनेचा तपास जसजसा पुढे सरकत गेला, तसतसे हे थंड डोक्याने आखलेले हत्याकांड असल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी पोलिसांनी सात आरोपींना अटक केली असून, एक आरोपी अद्याप फरार आहे.

मृत नीरज शर्मा (४५) या जयपूर जिल्हा न्यायालयात लोअर डिव्हिजन क्लर्क (एलडीसी) म्हणून कार्यरत होत्या. पतीच्या निधनानंतर अनुकंपा तत्त्वावर त्यांना ही सरकारी नोकरी मिळाली होती. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, त्यांची मुलगी आयुषी शर्मा हिला ही नोकरी स्वतःला मिळावी, तसेच कुटुंबाची मालमत्ता आपल्या ताब्यात यावी, अशी इच्छा होती. मात्र आईने नोकरी स्वीकारल्यानंतर दोघींमध्ये वारंवार वाद होत होते. अखेर आई जिवंत असेपर्यंत आपले उद्दिष्ट पूर्ण होणार नाही, असा निष्कर्ष काढत आयुषीने नातेवाईकांच्या मदतीने कट रचल्याचे समोर आले.
पोलिसांच्या तपासानुसार, आयुषीने तिचा चुलता मोहन स्वरूप आणि चुलत भाऊ बलराम उर्फ रवी यांच्याशी संपर्क साधून भरतपूर येथील हेमंत शर्मा या गुन्हेगारामार्फत हत्या घडवून आणण्याचे ठरवले. यासाठी तब्बल सात लाख रुपयांची सुपारी देण्यात आली. आरोपींनी प्रथम थार गाडी भाड्याने घेऊन नीरज शर्मा यांच्या येण्या-जाण्याच्या वेळा, मार्ग आणि दैनंदिन हालचालींची जवळपास महिनाभर रेकी केली. योग्य संधी मिळताच ३ जुलै रोजी सायंकाळी त्या मुलाला कोचिंग क्लासमध्ये सोडून घरी परतत असताना भरधाव स्कॉर्पिओने त्यांना लक्ष्य केले.

तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, स्कॉर्पिओचा वेग सुमारे १३० किमी प्रतितास होता. जोरदार धडकेमुळे नीरज शर्मा सुमारे १०० फूट दूर फेकल्या गेल्या आणि घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाला. सुरुवातीला पोलिसांनी अपघात म्हणून तपास सुरू केला होता. मात्र सीसीटीव्ही फुटेज, वाहनांच्या हालचाली, मोबाईल लोकेशन, कॉल रेकॉर्ड आणि अन्य तांत्रिक पुराव्यांच्या आधारे हा पूर्वनियोजित खून असल्याचे निष्पन्न झाले.

मृत महिलेचे भाऊ राकेश कुमार शर्मा यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत, नीरज शर्मा यांना मुलगी आणि काही नातेवाईकांकडून मालमत्तेच्या कारणावरून सतत त्रास दिला जात होता. त्यांना अनेकदा जीवे मारण्याच्या धमक्याही मिळाल्या होत्या, असा आरोप करण्यात आला होता. या माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयितांची चौकशी सुरू केली. अखेर आयुषी शर्माने गुन्ह्यातील सहभागाची कबुली दिल्याचे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले.
या प्रकरणात आयुषी शर्मा, मोहन स्वरूप, हेमंत शर्मा, मोहित शर्मा, आकाश शर्मा, अरविंद शर्मा आणि रोहित जाटव यांना अटक करण्यात आली आहे. तर कटातील महत्त्वाचा दुवा मानला जाणारा बलराम उर्फ रवी अद्याप फरार असून त्याचा शोध सुरू आहे. या हत्याकांडामुळे सरकारी नोकरी आणि संपत्तीच्या हव्यासातून रक्ताच्या नात्यांचाही बळी दिला जाऊ शकतो, याचे भयावह वास्तव पुन्हा एकदा समोर आले आहे.