वारीत सौरऊर्जेची साथ! वारकऱ्यांसाठी मोबाईल चार्जिंगची खास सुविधा; महाऊर्जाचा हरित ऊर्जेला प्रोत्साहन देणारा उपक्रम


पुणे : आषाढी वारीच्या आध्यात्मिक प्रवासाला यंदा हरित ऊर्जेची जोड मिळाली आहे. लाखो वारकऱ्यांना वारीदरम्यान कुटुंबीयांशी संपर्कात राहता यावे आणि आपत्कालीन वेळी मोबाईलचा वापर करता यावा, यासाठी महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (महाऊर्जा) यांनी पालखी सोहळ्यात सहभागी दिंडींसाठी सौरऊर्जेवर आधारित मोबाईल चार्जिंग सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

स्वच्छ ऊर्जा, आधुनिक तंत्रज्ञान आणि वारकरी सेवेला जोडणारा हा उपक्रम वारीमध्ये विशेष आकर्षण ठरत आहे. अक्षय ऊर्जेचा लोकाभिमुख वापर कसा करता येतो, याचे हे उत्तम उदाहरण मानले जात आहे.

आषाढी वारी २०२६ निमित्त श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासोबत पंढरपूरकडे जाणाऱ्या दिंडीतील वारकऱ्यांसाठी महाऊर्जामार्फत सोलर मोबाईल चार्जर संच उपलब्ध करून देण्यात आले आहेत. ही सुविधा २५ जुलै २०२६ पर्यंत उपलब्ध राहणार आहे.

वारीच्या लांब प्रवासादरम्यान वारकऱ्यांना कुटुंबीयांशी सातत्याने संपर्क ठेवता यावा, आवश्यक माहितीची देवाणघेवाण करता यावी तसेच गरजेच्या वेळी मोबाईलचा वापर करता यावा, यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला आहे.

सौरऊर्जेवर आधारित या चार्जिंग सुविधेमुळे पारंपरिक विजेवरील अवलंबित्व कमी होणार असून, पर्यावरणपूरक ऊर्जेचा वापर वाढण्यास मदत होणार आहे.

महाऊर्जा राज्य शासनाच्या अक्षय ऊर्जा आणि ऊर्जा संवर्धन धोरणांतर्गत विविध उपक्रम राबवत आहे. आषाढी वारीतील हा उपक्रम स्वच्छ, हरित आणि शाश्वत ऊर्जेच्या प्रसारासाठी महत्त्वपूर्ण ठरत असून, वारकऱ्यांना सुविधा देतानाच सौरऊर्जेबाबत जनजागृती करण्याचा उद्देशही साध्य होत आहे.

महाऊर्जाने वारकऱ्यांना या सौर मोबाईल चार्जिंग सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!