गावगाड्याच्या निवडणुकांना ब्रेक? १५ हजार ग्रामपंचायतींच्या निवडणुकांबाबत मोठी माहिती समोर

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागातील राजकीय घडामोडींना तूर्तास ब्रेक लागला आहे. ग्रामीण भागातील राजकारणातील महत्त्वाची आणि गावगाड्याचा कारभारी ठरवणारी ग्रामपंचायत निवडणूक लांबणीवर जाण्याची शक्यता आहे.

प्रभाग आरक्षण जाहीर झाले असले तरी एका कारणामुळे ग्रामपंचायतींच्या निवडणुका थेट पुढील वर्षावर जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या अपेक्षांवर पाणी फेरले गेले आहे. राज्यातील जवळपास १५ हजार ग्रामपंचायतींच्या निवडणुका लांबणीवर पडण्याची चिन्हे आहेत.
वर्ष २०२४, २०२५ मध्ये मुदत संपलेल्या आणि २०२६ मध्ये मुदत संपणाऱ्या तब्बल १५ हजार ६३६ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका पुढे ढकलल्या जाण्याची शक्यता आहे. राज्यात सध्या सुरू असलेल्या मतदारयादी पडताळणीच्या ‘एसआयआर’ (विशेष सखोल पुनरीक्षण) प्रक्रियेमुळे हा पेच निर्माण झाला असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता निवडणुकांचा बिगुल थेट २०२७ मध्ये वाजण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

राज्य निवडणूक आयोगाने या १५ हजार ६३६ ग्रामपंचायतींसाठी प्रभाग रचना आणि प्रभाग आरक्षण सोडतीची प्रक्रिया पूर्ण केली आहे. बुधवारी (८ जुलै) प्रभाग आरक्षण अंतिम करण्यात आले असून, शुक्रवारी (१० जुलै) ते प्रसिद्ध केले जाणार आहे. सामान्यतः आरक्षण प्रसिद्ध झाल्यानंतर प्रभागनिहाय मतदारयाद्या आणि निवडणूक कार्यक्रम जाहीर केला जातो. मात्र, सुरू असलेल्या ‘एसआयआर’ प्रक्रियेमुळे संपूर्ण गणित बदलले आहे.

‘एसआयआर’ प्रक्रियेत मतदारयादीतील मृत, स्थलांतरित आणि अपात्र मतदारांची नावे वगळली जात आहेत. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ७ ऑक्टोबर रोजी अंतिम मतदारयादी प्रसिद्ध होणार आहे. बोगस मतदानाला आळा घालण्यासाठी नवीन मतदारयादीच्या आधारेच निवडणुका घेण्याचा आग्रह अनेक जिल्हाधिकाऱ्यांनी धरला आहे.
या प्रक्रियेमुळे ऑक्टोबरनंतर प्रभागनिहाय मतदारयाद्या तयार करण्यासाठी आणखी एक ते दीड महिन्याचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे नोव्हेंबर किंवा डिसेंबर उजाडणार असल्याने प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम आता थेट पुढील वर्षात जाहीर होण्याची शक्यता आहे.