‘लाईट, कॅमेरा, ॲक्शन’च्या आड आरोग्याचा प्रश्न; चित्रपटांच्या सेटवरील जेवणावर एफडीए कारवाईची मागणी

पुणे : महाराष्ट्रातील चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका आणि वेब मालिकांच्या चित्रीकरण स्थळांवर कलाकार व तंत्रज्ञांना पुरविल्या जाणाऱ्या अन्नाच्या गुणवत्तेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या चित्रपट, साहित्य, कला व सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी अन्न व औषध प्रशासनाचे (एफडीए) अपर मुख्य सचिव तुकाराम मुंढे यांना पत्र पाठवून या प्रकरणी तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे.

मुंबई, पुणे, नाशिकसह राज्यातील अनेक शहरांमध्ये विविध भाषांतील चित्रपट, मालिका आणि वेब मालिकांचे चित्रीकरण मोठ्या प्रमाणावर सुरू असते. या चित्रीकरणांमध्ये हजारो कलाकार, तंत्रज्ञ, सहाय्यक कर्मचारी आणि कामगार दिवस-रात्र मेहनत घेत असतात. मात्र, त्यांना पुरविल्या जाणाऱ्या अन्नाच्या दर्जाबाबत सातत्याने तक्रारी येत असल्याचे पाटील यांनी पत्रात नमूद केले आहे.
काही चित्रीकरण स्थळांवर अस्वच्छ, निकृष्ट दर्जाचे आणि अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन करणारे अन्न दिले जात असल्याने कलाकार व तंत्रज्ञांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सलग १२ ते १६ तास काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पौष्टिक, स्वच्छ आणि सुरक्षित आहार मिळणे ही निर्मिती संस्था व केटरिंग कंत्राटदारांची नैतिक आणि कायदेशीर जबाबदारी असल्याचे त्यांनी अधोरेखित केले आहे.

पत्राद्वारे राज्यभरातील सर्व चित्रीकरण स्थळांवर अचानक तपासणी मोहीम राबविणे, अन्नाचे नमुने तपासणे, दोषी आढळणाऱ्या केटरिंग सेवा व निर्मात्यांवर कठोर कारवाई करणे, तसेच अन्नाची गुणवत्ता, पिण्याचे पाणी, स्वयंपाकगृहांची स्वच्छता आणि वितरण व्यवस्थेबाबत स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

भेसळयुक्त अन्नाविरोधात सध्या एफडीएकडून सुरू असलेल्या मोहिमेच्या पार्श्वभूमीवर या विषयाचीही गांभीर्याने दखल घेतली जाईल, अशी अपेक्षा मनोरंजन क्षेत्रातून व्यक्त होत आहे. कलाकार आणि तंत्रज्ञांच्या आरोग्याचा प्रश्न आता प्रशासनासमोर ठळकपणे मांडला गेला असून, पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.