20 लाखांत हक्काचं घर! पुण्यात 4 हजार घरांची मेगा लॉटरी; वाघोली, हिंजवडीसह IT हबमध्ये संधी


पुणे : पुणेकरांसाठी घर खरेदीचं स्वप्न साकार करण्याची मोठी संधी लवकरच उपलब्ध होणार आहे. पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ (म्हाडा) जुलै 2026 च्या अखेरीस पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पीएमआरडीए क्षेत्रातील तब्बल 4 हजार घरांची मेगा सोडत काढण्याच्या तयारीत आहे. विशेष म्हणजे या घरांच्या किमती 20 ते 30 लाख रुपयांच्या दरम्यान असण्याची शक्यता असल्याने सर्वसामान्य आणि मध्यमवर्गीय नागरिकांमध्ये उत्सुकता वाढली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोडतीतील सुमारे 3 हजार घरे खाजगी विकासकांच्या प्रकल्पांमधून ‘20 टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजने’अंतर्गत उपलब्ध होणार आहेत. तर उर्वरित 1 हजार घरे म्हाडाच्या स्वतःच्या गृहप्रकल्पांतील किंवा मागील सोडतींमध्ये शिल्लक राहिलेल्या सदनिका असतील.

या सोडतीतील घरे प्रामुख्याने अत्यल्प आणि अल्प उत्पन्न गटातील नागरिकांसाठी राखीव असणार असून 1 आरके आणि 1 बीएचके सदनिकांचा मोठ्या प्रमाणावर समावेश असेल. पुणे शहरासह पिंपरी-चिंचवड परिसरातील विविध भागांबरोबरच वाघोली, हिंजवडी, चऱ्होली, म्हाळुंगे आणि वाकड यांसारख्या वेगाने विकसित होणाऱ्या उपनगरांमध्येही घरांची उपलब्धता असणार आहे.

सोडतीसाठी अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन राबवली जाणार आहे. इच्छुकांना म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर नोंदणी करून अर्ज सादर करता येणार असून कागदपत्रे अपलोड करणे आणि अनामत रक्कम भरण्याची सुविधाही ऑनलाइनच उपलब्ध असेल. यासंदर्भातील अधिकृत जाहिरात आणि वेळापत्रक लवकरच जाहीर होण्याची शक्यता असून पुणेकरांचे लक्ष आता या बहुप्रतीक्षित मेगा लॉटरीकडे लागले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!