शरद पवार मोठा राजकीय निर्णय घेणार? विश्वासू नेत्याची भाजपच्या वरिष्ठ नेत्यासोबत गुप्त बैठक; राजकीय चर्चांना उधाण


मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे गटातील सहा खासदारांच्या फुटीची चर्चा रंगली होती. आता मात्र राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए)मध्ये सहभागी होणार का, याबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

गेल्या काही दिवसांपासून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सत्तेत सहभागी होण्याबाबत दोन मतप्रवाह असल्याची चर्चा आहे. एका गटाची सत्ताधारी बाकावर बसण्याची इच्छा असून, दुसरा गट विरोधी पक्षातच राहण्याच्या भूमिकेत असल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, शरद पवार यांनी पक्षातील सर्व आमदार आणि खासदारांची भूमिका जाणून घेण्याची जबाबदारी एका वरिष्ठ नेत्यावर सोपवल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. तसेच भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाशी चर्चा करण्याची जबाबदारीही त्याच नेत्याकडे देण्यात आल्याची चर्चा आहे. सध्या पक्षाचे १० आमदार आणि ८ खासदार यांची भूमिका जाणून घेण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले जात आहे.

याच पार्श्वभूमीवर मुंबईतील एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि भाजपचे वरिष्ठ नेते विनोद तावडे यांच्यात बैठक झाल्याची माहिती समोर आली आहे. या बैठकीनंतर राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे.

यापूर्वीही दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे गट एकत्र येऊन सत्तेत सहभागी होणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र त्यानंतर त्या चर्चांना पूर्णविराम मिळाला होता. आता पुन्हा एकदा शरद पवार गट भाजपप्रणीत एनडीएमध्ये सहभागी होणार का, याबाबत राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क सुरू झाले आहेत.

सूत्रांच्या माहितीनुसार, पवार गट महायुतीत सहभागी झाल्यास सत्तेत किती आणि कोणता वाटा मिळू शकतो, यावर जयंत पाटील आणि विनोद तावडे यांच्यात चर्चा झाली. त्यानंतर जयंत पाटील यांनी शरद पवार गटातील आणखी एका वरिष्ठ नेत्याशीही यासंदर्भात चर्चा केल्याचे समजते. या सर्व घडामोडींमुळे शरद पवार गटाच्या सत्ताधारी आघाडीकडे वाटचालीच्या चर्चांना अधिक बळ मिळाले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!