पंढरीच्या वारीत प्रथमच ‘एअर ॲम्ब्युलन्स’ची एन्ट्री! लाखो वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी सरकारची ऐतिहासिक आरोग्य योजना

पुणे : यंदाच्या आषाढी वारीत लाखो वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी राज्य सरकारने प्रथमच एअर ॲम्ब्युलन्स सेवा उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. गर्दीच्या काळात गंभीर रुग्णांना तातडीने उपचार मिळावेत, यासाठी हेलिकॉप्टर रुग्णवाहिकेची व्यवस्था केली जाणार असून वारीच्या आरोग्य व्यवस्थेत हा मोठा बदल मानला जात आहे.

आरोग्य विभागाच्या नियोजनानुसार 22 ते 29 जुलै या कालावधीत एअर ॲम्ब्युलन्स सेवा कार्यरत राहणार आहे. या सेवेसाठी सोलापूर येथील हेलिपॅडचा वापर करण्यात येणार असून हृदयविकाराचा झटका, पक्षाघात, अपघात किंवा इतर गंभीर आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना तातडीने जवळच्या विशेष रुग्णालयात हलविण्यात येणार आहे. यासाठी निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून लवकरच सेवा सुरू होणार आहे.
याशिवाय संपूर्ण पालखी मार्गावर 353 रुग्णवाहिका, 43 आयसीयू सुविधा आणि 156 प्राथमिक उपचार केंद्रे कार्यरत राहतील. पंढरपूरमध्ये अतिरिक्त आयसीयू, महाआरोग्य शिबिर आणि 24 तास वैद्यकीय सेवा उपलब्ध असणार आहे. वारीच्या सेवेसाठी 3,087 वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी तसेच 302 तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली आहे.

आरोग्य व्यवस्थेला डिजिटल बळ देण्यासाठी विशेष मोबाईल ॲपही सुरू करण्यात येणार आहे. पाणी स्रोतांचे निर्जंतुकीकरण, डेंग्यू-मलेरिया प्रतिबंध, अन्न विक्रेत्यांची तपासणी आणि आरोग्य जनजागृतीवर विशेष भर दिला जाणार आहे. तसेच पालखी मार्गावरील खासगी रुग्णालयांमध्ये अत्यावश्यक उपचारांसाठी 10 टक्के खाटा राखीव ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. वारकरी घरातून निघाल्यापासून सुरक्षितपणे घरी परतेपर्यंत आवश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजन आरोग्य विभागाने केले असून, यंदाची वारी अधिक सुरक्षित आणि आरोग्यसंपन्न करण्यावर सरकारचा भर आहे.
