महत्वाची बातमी! पुण्यात पावसाचा जोर वाढणार, हवामान खात्याचा रेड अलर्ट, सिंहगड पर्यटकांसाठी बंद, मावळमध्ये भूस्खलनात कुटुंब ढिगाऱ्याखाली गाडलं

पुणे : गेल्या काही तासांपासून पुणे आणि मुंबईच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत आहे. यामुळे अनेक मार्ग बंद करण्यात आले असून गरज नसेल तर घराबाहे न पडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. भारतीय हवामान विभागानं पुणे जिल्ह्यासाठी आज आणि उद्या रेड अलर्ट जारी केला असून, जिल्ह्यात अनेक ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

यामुळे पुणे आणि मुंबईकडे प्रवास करणाऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. अतिवृष्टीमुळे पुण्याकडे आणि मुंबईकडे जाणारी वाहतूक ठप्प आहे. तसेच सिंहगड घाट परिसर हा दरडप्रवण क्षेत्र असल्यानं मुसळधार पावसामुळे दरड कोसळणं, झाडं उन्मळून पडणं, दगड घसरणं, रस्त्यावर पाणी साचणं आणि इतर नैसर्गिक आपत्ती उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही.
नव्यानं खुला करण्यात आलेल्या मिसिंग लिंकवर दरड कोसळलेली आहे. आधीच्या द्रुतगती मार्गावर अमृतांजन पुलाजवळ आणि खालापूर टोल नाक्याजवळ पाणीचं पाणी साचलेलं आहे. तसेच, जुन्या पुणे-मुंबई महार्गावर दरड कोसळलेली आहे. त्यामुळं पुणे आणि मुंबई महामार्गावरुन प्रवास करणं आज अशक्य आहे.

नागरिक, पर्यटकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देऊन सिंहगड घाट परिसरातील पर्यटकांचा प्रवेश आज आणि उद्या दिनांक 6, 7 जुलै रोजी तात्पुरता बंद ठेवण्यात येणार आहे. पावसाची परिस्थिती पाहून सिंहगड किल्यावर पर्यटकांना प्रवेश द्यायचा की नाही हे ठरवण्यात येईल. दुसरीकडे पुणे-मुंबई लोहमार्गावर ठाकूरवाडी परिसरात दरड कोसळली आहे.

यामुळं हा पर्याय ही बंद आहे. महामार्ग आणि लोहमार्ग हे दोन्ही मार्ग आज वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्याचं पोलीस प्रशासनाकडून जाहीर करण्यात आलंय. त्यामुळं पुणे आणि मुंबई प्रवास करणाऱ्यांनी घराबाहेर न पडण्याचा सल्ला प्रशासनाने दिलाय. तसेच खंडाळा ते मंकी हिल आणि ठाकूरवाडी दरम्यान रेल्वे रुळांवर अनेक ठिकाणी दगड आणि माती वाहून आल्याने सुरक्षिततेच्या कारणास्तव या मार्गावरील रेल्वे वाहतूक तात्पुरती बंद करण्यात आली आहे. मावळ मध्ये काही ठिकाणी घरांवर दरड कोसळली असल्याने घरे ढिगाखाली अडकली आहेत.