₹75 ची फी झाली शून्य! आधारधारकांसाठी मोठी खुशखबर; आता 31 डिसेंबरपर्यंत घरबसल्या FREE करा Email Update

पुणे : देशातील कोट्यवधी आधारधारकांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला आहे. UIDAI ने आधार कार्डवरील ई-मेल आयडी अपडेट करण्याची सुविधा 31 डिसेंबर 2026 पर्यंत पूर्णपणे मोफत उपलब्ध करून दिली आहे. यापूर्वी ई-मेल आयडी बदलण्यासाठी ₹75 आणि जीएसटी भरावा लागत होता. मात्र आता अधिकृत Aadhaar App च्या माध्यमातून नागरिकांना कोणतेही शुल्क न भरता ही प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे. हा निर्णय 1 जुलै 2026 पासून लागू करण्यात आला असून तो सहा महिन्यांसाठी वैध असेल.

ई-मेल आयडी आधारशी जोडलेला असल्यास विविध सरकारी सेवा, ऑनलाइन पडताळणी, बँकिंग व्यवहार, डिजिटल KYC आणि अनेक महत्त्वाच्या अर्ज प्रक्रियेत सोय होते. त्यामुळे आधारवरील संपर्क माहिती अद्ययावत ठेवण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
ई-मेल अपडेट करण्यासाठी नागरिकांनी अधिकृत Aadhaar App डाउनलोड करून लॉगिन करावे. त्यानंतर ‘Update Email’ किंवा ‘Update Aadhaar Details’ हा पर्याय निवडून नवीन ई-मेल आयडी नोंदवावा. मोबाईल OTP आणि आवश्यक पडताळणी पूर्ण झाल्यानंतर ई-मेल अपडेटची प्रक्रिया पूर्ण होते. या सुविधेसाठी आधार सेवा केंद्रावर जाण्याची आवश्यकता नाही.

तज्ज्ञांच्या मते, आधारवरील ई-मेल आणि इतर संपर्क माहिती अद्ययावत असल्यास भविष्यातील ऑनलाइन सेवांचा लाभ घेणे अधिक सोपे होते. त्यामुळे ज्यांचा ई-मेल आयडी बदलला आहे किंवा आधारमध्ये नोंदलेला नाही, त्यांनी 31 डिसेंबर 2026 पूर्वी या मोफत सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
