वर्दीची दादागिरी महागात! पुण्यात कॅफेत PSI चा धिंगाणा, व्हिडिओ व्हायरल होताच निलंबनाची कारवाई

पुणे : पुण्यातील डेक्कन परिसरात एका कॅफेमध्ये पोलीस उपनिरीक्षकाने कथितरित्या केलेल्या गैरवर्तनाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलीस प्रशासनाने कठोर भूमिका घेत संबंधित अधिकाऱ्याला निलंबित केले आहे. कर्तव्यावर असताना सार्वजनिक ठिकाणी गैरवर्तन केल्याचा आरोप या अधिकाऱ्यावर असून, या घटनेमुळे पोलीस दलाच्या शिस्तीबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, डेक्कन पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक संदीप कदम यांची ६ ते ७ जूनदरम्यान रात्रगस्त अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्याच काळात पहाटे सुमारे १.४५ वाजण्याच्या सुमारास ते शिरोळे रस्त्यावरील ‘जिप्सीया कॅफे’मध्ये पोहोचले. यावेळी त्यांनी कॅफेमधील काउंटरवर ठेवलेले कॉफीचे ग्लास आणि इतर साहित्य खाली फेकल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच कॅफेमध्ये बसून गप्पा मारत असलेल्या ग्राहकांना उठून बाहेर जाण्यास सांगितल्याचेही समोर आले आहे.
याचवेळी कॅफेतील कर्मचाऱ्यांशी त्यांनी अरेरावीची भाषा वापरत उद्धट वर्तन केल्याचाही आरोप आहे. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे ग्राहक आणि कर्मचारी काही काळ गोंधळून गेले. संपूर्ण घटना कॅफेमध्ये बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये कैद झाली.

घटनेचा व्हिडिओ काही दिवसांनी सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर नागरिकांकडून पोलीस अधिकाऱ्याच्या वर्तनावर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. व्हिडिओ मोठ्या प्रमाणात चर्चेत आल्यानंतर पुणे पोलीस प्रशासनाने तत्काळ अंतर्गत चौकशीचे आदेश दिले.

प्राथमिक चौकशीत संबंधित अधिकाऱ्याने शिस्तभंग केल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाल्याचे सांगितले जात आहे. कर्तव्यावर असताना अशा प्रकारचे वर्तन पोलीस दलाच्या प्रतिमेला धक्का पोहोचवणारे असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर अप्पर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे यांनी संदीप कदम यांच्यावर निलंबनाची कारवाई केली.
दरम्यान, या घटनेमुळे पोलीस दलातील शिस्त, जबाबदारी आणि सार्वजनिक ठिकाणी अधिकाऱ्यांच्या वर्तनाबाबत पुन्हा प्रश्न उपस्थित झाले आहेत. संबंधित प्रकरणाची विभागीय चौकशी सुरू असून, चौकशी अहवालानंतर आवश्यक असल्यास पुढील प्रशासकीय कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.