पुढचे काही दिवस जपून! महाराष्ट्रातील ‘या’ भागांत मुसळधार पावसाचा इशारा; हवामान विभागाचा मोठा अलर्ट


पुणे : कडाक्याच्या उन्हामुळे हैराण झालेल्या महाराष्ट्राला अखेर पावसाने दिलासा दिला आहे. राज्यात मान्सून सक्रिय झाला असून अनेक भागांत चांगला पाऊस झाला आहे. मात्र दोन दिवस सलग बरसल्यानंतर शुक्रवारी पावसाने काहीशी विश्रांती घेतली. तरीही ही विश्रांती फार काळ टिकणार नसल्याचे संकेत भारतीय हवामान विभागाने दिले आहेत.

हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार, शनिवार (२७ जून) रोजी कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांत जोरदार पावसाची शक्यता आहे. तर राज्यातील इतर भागांमध्ये मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस कोसळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पुण्यात रविवारी पुन्हा पावसाचा जोर वाढणार

गेल्या दोन दिवसांत समाधानकारक पाऊस झाल्यानंतर पुणे शहरात शुक्रवारी पावसाने विश्रांती घेतली. दिवसभर ढगाळ वातावरण असूनही पावसाने हजेरी लावली नाही. परिणामी तापमानात किंचित वाढ झाली. मात्र हवामान विभागानुसार रविवारी पुण्यात पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. पुढील दोन दिवस आकाश ढगाळ राहणार असून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

या जिल्ह्यांना यलो अलर्ट

पुण्यासह रायगड, रत्नागिरी आणि अहिल्यानगर जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता लक्षात घेऊन यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. याशिवाय ठाणे, मुंबई, नाशिक, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

जारकरवाडीत ढगफुटीसदृश पावसाचा तडाखा; शेतीचे मोठे नुकसान

दरम्यान, आंबेगाव तालुक्यातील जारकरवाडी येथे मान्सूनपूर्व ढगफुटीसदृश पावसाने मोठा फटका बसला आहे. मुसळधार पावसामुळे अनेक शेतांमध्ये पाणी साचले असून उभी पिके पाण्याखाली गेली आहेत. खरीप हंगामासाठी तयार केलेली शेतीही अनेक ठिकाणी वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे केली आहे. मान्सूनच्या सुरुवातीलाच झालेल्या या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांसमोर नव्या अडचणी उभ्या राहिल्या आहेत

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!