बोगस बियाणे-खत विक्रेत्यांवर ‘मकोका’? पावसाळी अधिवेशनात विधानसभेत मोठी मागणी; बळीराजाची फसवणूक थांबणार?


मुंबई : राज्यात मान्सूनने जोरदार हजेरी लावल्याने खरीप हंगामातील पेरण्यांना वेग आला आहे. शेतकरी मोठ्या प्रमाणावर बियाणे, खते आणि शेतीसाठी आवश्यक साहित्याची खरेदी करत आहेत. मात्र, याच काळात बोगस बियाणे आणि खतांच्या विक्रीचे प्रकार वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे उमरगा-लोहारा मतदारसंघाचे आमदार प्रवीण स्वामी यांनी विधानसभेत सरकारचे लक्ष वेधत कठोर कारवाईची मागणी केली.

पावसाळी अधिवेशनात बोलताना प्रवीण स्वामी यांनी बोगस बियाणे आणि खतांची निर्मिती व विक्री करणाऱ्या टोळ्यांमुळे शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत असल्याचे सांगितले. अशा प्रकारच्या गुन्ह्यांकडे केवळ आर्थिक फसवणूक म्हणून न पाहता, संघटित गुन्हेगारी म्हणून पाहण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.

यासाठी बोगस बियाणे आणि खतांचा काळाबाजार करणाऱ्या टोळ्यांवर ‘महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका)’ लागू करून कठोर कारवाई करण्यात यावी, अशी ठाम मागणी त्यांनी विधानसभेत केली. शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांना कोणतीही दया न दाखवता कठोर शिक्षा झाली पाहिजे, असेही ते म्हणाले.

याशिवाय, बोगस बियाणे व खतांचा काळाबाजार कायमचा बंद करण्यासाठी प्रभावी कायदेशीर यंत्रणा उभारावी, संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करावी आणि दोषींवर तातडीने फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणीही त्यांनी सरकारकडे केली.

दरम्यान, राज्यात पेरणीचा हंगाम वेगात सुरू असताना शेतकऱ्यांची फसवणूक रोखण्यासाठी सरकार कोणती ठोस पावले उचलते आणि प्रवीण स्वामी यांच्या ‘मकोका’च्या मागणीवर काय निर्णय घेते, याकडे आता राज्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!