चारित्र्यावर संशयातून पत्नीवर लोखंडी फायटरने हल्ला; पाच वर्षीय मुलाला पळवून नेण्याचीही धमकी

लोणी काळभोर, ता. २२ : कौटुंबिक वादामुळे एक वर्षापासून पतीपासून विभक्त राहत असलेल्या २२ वर्षीय महिलेवर भररस्त्यात लोखंडी फायटरने हल्ला करून गंभीर दुखापत केल्याची घटना कवडीपाट टोलनाक्याजवळ १८ जून रोजी सायंकाळी घडली आहे. तसेच पाच वर्षीय मुलाला उचलून नेण्याची आणि पत्नीला जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

याप्रकरणी २२ वर्षीय विवाहितेने दिलेल्या फिर्यादीवरून रमाकांत ईश्वर शिंदे (वय २४, रा. वारजे माळवाडी) याचेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडिता या कुंजीरवाडी परिसरात आई व मुलासोबत राहत असून, मांजरी येथील एका वाहन विक्री केंद्रात सेल्सगर्ल म्हणून काम करतात. कौटुंबिक मतभेदांमुळे त्या एप्रिल २०२५ पासून पतीपासून विभक्त राहत आहेत.
गुरुवारी पीडिता कामावरून रिक्षाने कुंजीरवाडीकडे परतत असताना कवडीपाट टोलनाक्याजवळ त्यांचे पती रमाकांत शिंदे यांनी दुचाकीवरून पाठलाग करुन रिक्षा अडवली. मोबाईल फोन तपासण्याच्या बहाण्याने चारित्र्यावर संशय घेत त्याने तिचा हात पिरगळला, पाठीत व चेहऱ्यावर बुक्क्यांनी मारहाण केली. व हातातील लोखंडी फायटरने डाव्या डोळ्याखाली वार करून जखमी केली.

यानंतर त्याने अश्लील शिवीगाळ करत, “पुढच्या वेळी तुझा पाय तोडीन,” अशी धमकी दिली. याचबरोबर वेळोवेळी व्हॉट्सअॅपद्वारे जीवे मारण्याचे संदेश पाठविणे आणि पाच वर्षीय मुलाला उचलून नेण्याची धमकी दिल्याचाही आरोपही महिलेने केला आहे. याप्रकरणी रमाकांत शिंदे च्या विरोधात लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
