कुंजीरवाडीतून १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी बेपत्ता; आमिष दाखवून पळवून नेल्याचा संशय, अपहरणाचा गुन्हा दाखल

लोणी काळभोर, ता. २२ : हवेली तालुक्यातील कुंजीरवाडी ग्रामपंचायत हद्दीतील बाजारतळ परिसरातून १५ वर्षीय परप्रांतीय अल्पवयीन मुलगी रहस्यमयरीत्या बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अज्ञात व्यक्तीने आमिष दाखवून तिला फूस लावून पळवून नेल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून, याप्रकरणी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलीचे ४५ वर्षीय वडील कुंजीरवाडी येथील एका नर्सरीमध्ये मजुरीचे काम करतात. ते आपल्या कुटुंबासह गुंजाळ मळा परिसरात वास्तव्यास असून मूळचे उत्तर प्रदेशातील फरुखाबाद जिल्ह्यातील रहिवासी आहेत. त्यांची १५ वर्षे १ महिना ७ दिवस वयाची मुलगी १६ जून रोजी रात्री सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास कुंजीरवाडी बाजारतळ परिसरातून अचानक बेपत्ता झाली.
तक्रारीनुसार, अज्ञात व्यक्तीने मुलीच्या अल्पवयाचा फायदा घेत तिला कशाचे तरी आमिष दाखवून फूस लावली आणि पालकांच्या संमतीशिवाय तिला सोबत घेऊन गेल्याचा आरोप करण्यात आला आहे. मुलगी बेपत्ता झाल्यानंतर कुटुंबीयांनी नातेवाईकांसह परिसरात सर्वत्र शोध घेतला; मात्र तिचा कोणताही ठावठिकाणा लागला नाही.

अखेर कुटुंबीयांनी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी तातडीने गुन्हा नोंदवत घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक योगेश पैठणे करीत आहेत.
