आषाढी वारीसाठी एसटीचा महाप्लॅन! 5,500 विशेष बसेस, वारकऱ्यांना मोफत व सवलतीच्या प्रवासाची सुविधा

मुंबई : आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरकडे जाणाऱ्या लाखो वारकऱ्यांसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) यंदा मोठी तयारी केली आहे. भाविकांचा प्रवास सुरक्षित, सुलभ आणि आरामदायी व्हावा यासाठी राज्यभरातून तब्बल 5,500 विशेष एसटी बसेस सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही माहिती देत वारकऱ्यांच्या सेवेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आल्याचे स्पष्ट केले.

यंदाच्या वारीत राज्यातील कोणत्याही गावातून 40 किंवा त्याहून अधिक भाविकांनी एकत्रित मागणी केल्यास त्या गावातून थेट पंढरपूरसाठी विशेष बस उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील वारकऱ्यांनाही थेट प्रवासाची सुविधा मिळणार आहे.
आषाढी वारीदरम्यान लाखो भाविक पालख्या, दिंड्या, रेल्वे, खासगी वाहने आणि एसटीच्या माध्यमातून पंढरपूरकडे रवाना होतात. ही प्रचंड गर्दी लक्षात घेऊन एसटी महामंडळाने विशेष वाहतूक आराखडा तयार केला आहे. भाविकांनी जवळच्या एसटी आगाराशी संपर्क साधून विशेष बसची आगाऊ नोंदणी करावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

विशेष म्हणजे शासनाच्या विविध सवलत योजनांचा लाभ या विशेष बस सेवांमध्येही कायम राहणार आहे. ‘अमृत ज्येष्ठ नागरिक योजना’ अंतर्गत 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवासाची सुविधा मिळणार आहे. तर ‘महिला सन्मान योजना’ अंतर्गत महिलांना तिकीट दरात 50 टक्के सवलत देण्यात येणार आहे.

गेल्या वर्षी आषाढी यात्रेदरम्यान एसटी महामंडळाने 5,200 विशेष बसेसच्या माध्यमातून सुमारे 21 लाख 95 हजार भाविकांची ने-आण केली होती. यंदा वाढीव बसेस आणि सुधारित नियोजनामुळे अधिक भाविकांना सुविधा मिळण्याची अपेक्षा आहे.
वारी काळात सेवा देणाऱ्या चालक, वाहक, यांत्रिक कर्मचारी, पर्यवेक्षक आणि अधिकाऱ्यांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. सुमारे 13 हजार कर्मचाऱ्यांना चहा, नाश्ता आणि भोजनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यामुळे सलग अनेक दिवस सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांचा उत्साह वाढणार आहे.
पंढरपूरमध्ये भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन चंद्रभागा, भीमा (देगाव), विठ्ठल कारखाना आणि पांडुरंग (आयटीआय महाविद्यालय) येथे चार तात्पुरती बस स्थानके उभारण्यात येणार आहेत. या ठिकाणी पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, संगणकीय आरक्षण केंद्र, चौकशी कक्ष आणि मार्गदर्शन फलक यांसारख्या सुविधा उपलब्ध असतील.
एकादशीच्या दिवशी आणि त्यानंतरच्या परतीच्या प्रवासादरम्यान वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी 36 हून अधिक वाहतूक नियंत्रक आणि सुरक्षा रक्षक स्थानिक पोलीस प्रशासनाच्या समन्वयाने काम करणार आहेत.
“वारकऱ्यांची सेवा हीच विठ्ठलाची सेवा” या भावनेतून एसटीची संपूर्ण यंत्रणा यात्राकाळात अहोरात्र कार्यरत राहणार असल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले. आषाढी वारीसाठी केलेल्या या व्यापक नियोजनामुळे लाखो भाविकांचा पंढरपूर प्रवास अधिक सुरक्षित आणि सुविधाजनक होणार आहे.