‘हत्या झाली हे मान्य, मग आरोपी कोण?’; पवनराजे हत्याकांडाच्या निकालानंतर ओमराजेंचा संतप्त सवाल


मुंबई : राज्यातील सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांड प्रकरणात विशेष न्यायालयाने महत्त्वाचा निकाल दिला आहे. पुराव्यांच्या अभावामुळे माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्व नऊ आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. या निर्णयानंतर राजकीय आणि कायदेशीर वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले आहे.

न्यायालयाच्या निर्णयानंतर खासदार ओमराजे निंबाळकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. दोन दशकांहून अधिक काळ न्यायासाठी लढा दिल्यानंतर असा निकाल समोर येणे अत्यंत वेदनादायी असल्याचे त्यांनी म्हटले. न्यायालयाने दोन्ही कुटुंबांतील राजकीय वैराची बाब मान्य केली असतानाही सर्व आरोपींची निर्दोष सुटका झाल्याबद्दल त्यांनी प्रश्न उपस्थित केला.

माध्यमांशी बोलताना ओमराजे म्हणाले, “पवनराजे यांची हत्या झाली हे सत्य आहे आणि त्यामागे राजकीय वैर होते हेही स्पष्ट झाले आहे. मग ही हत्या नेमकी कोणी केली?” असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला. निकालपत्राचा सखोल अभ्यास करून पुढील कायदेशीर भूमिका निश्चित करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

या प्रकरणात सुरुवातीच्या तपासात अनेक त्रुटी होत्या आणि त्यामुळेच तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला होता, असेही त्यांनी नमूद केले. दरम्यान, या निकालाविरोधात सीबीआय उच्च न्यायालयात अपील दाखल करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे.

विशेष न्यायालयाच्या निर्णयानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी चर्चा केल्याचे वृत्त आहे. त्यानंतर या प्रकरणातील निर्दोष मुक्तीच्या निर्णयाला वरिष्ठ न्यायालयात आव्हान देण्याबाबत हालचाली सुरू झाल्या आहेत.

राजकीय घडामोडींविषयी विचारण्यात आले असता ओमराजे निंबाळकर यांनी कोणतेही स्पष्ट भाष्य करण्यास नकार दिला. सध्या आपले संपूर्ण लक्ष न्यायालयीन प्रक्रियेवर असून मतदारसंघातील नागरिकांशी चर्चा केल्यानंतरच पुढील राजकीय भूमिका जाहीर करू, असे त्यांनी सांगितले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!