रेशन कार्डमध्ये नावाची चूक? आता घरबसल्या सहज करता येणार दुरुस्ती..

नवी दिल्ली : रेशन कार्ड हे शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे दस्तऐवज मानले जाते. मात्र अनेक नागरिकांच्या रेशन कार्डमध्ये नावाचे स्पेलिंग, पत्ता किंवा इतर तपशीलांमध्ये चुका आढळून येतात. अशा त्रुटींमुळे शासकीय योजनांचा लाभ घेण्यात अडचणी निर्माण होऊ शकतात.

नागरिकांची ही समस्या लक्षात घेऊन सरकारने रेशन कार्डमधील माहिती दुरुस्त करण्याची सुविधा ऑनलाइन उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे आता नाव दुरुस्तीसाठी सरकारी कार्यालयांच्या फेऱ्या मारण्याची गरज नसून घरबसल्या अर्ज करता येणार आहे.
रेशन कार्डमधील नाव दुरुस्त करण्यासाठी संबंधित व्यक्तीचे आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, पॅन कार्ड, जन्म दाखला किंवा इतर आवश्यक कागदपत्रांची गरज भासू शकते. विवाहानंतर नाव बदलायचे असल्यास विवाह नोंदणी प्रमाणपत्रही सादर करावे लागते.

ऑनलाइन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी संबंधित राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या संकेतस्थळावर जाऊन ‘Ration Card Correction’ किंवा ‘Online Modification’ हा पर्याय निवडावा. त्यानंतर रेशन कार्ड क्रमांक आणि नोंदणीकृत मोबाईल क्रमांकाच्या मदतीने लॉगिन करून आवश्यक दुरुस्ती करता येते.

अर्ज सादर केल्यानंतर एक संदर्भ क्रमांक दिला जातो. या क्रमांकाच्या मदतीने अर्जाची स्थिती ऑनलाइन तपासता येते. अर्ज मंजूर झाल्यानंतर सुधारित माहिती रेशन कार्डमध्ये अद्ययावत केली जाते.