“आंब्याच्या झाडाजवळचा छोटा वाद ठरला जीवघेणा…” 18 वर्षीय विकास जाधवचा अल्पवयीन मित्राकडून गळा दाबून खून; पुणे हादरले

पुणे : पुण्यातील राजगड तालुक्यात मैत्रीच्या नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक घटना घडली आहे. आंब्याच्या झाडाजवळ झालेला किरकोळ वाद काही तासांतच जीवघेणा ठरला असून 18 वर्षीय विकास सुरेश जाधव याचा 15 वर्षीय अल्पवयीन मित्राने गळा दाबून खून केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मालवली (ता. राजगड) येथील राजतोरण शाळेच्या मैदानाजवळ काही मित्र एकत्र बसले होते. सुरुवातीला किरकोळ कारणावरून वाद झाला. काही वेळाने तो वाद शांतही झाला आणि सर्वजण निघून गेले. मात्र नियतीने वेगळेच वळण घेतले.
थोड्या वेळानंतर पुन्हा एकदा त्यांच्यात वाद उफाळला. कोंढवली फाट्याजवळ आरोपीने विकासला पुन्हा बोलावून घेतले. त्यानंतर दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली आणि क्षणात वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. याच रागाच्या भरात अल्पवयीन आरोपीने विकासचा गळा जोरात दाबल्याचा आरोप आहे.

घटनास्थळी उपस्थित असलेल्या मित्रांनी दोघांना वेगळे केले. पण त्यानंतर काही मिनिटांतच विकासची प्रकृती बिघडू लागली. तो शांत झाला, बोलत नव्हता आणि पाणीही पीत नव्हता. यामुळे घाबरलेल्या मित्रांनी त्याला तातडीने रुग्णालयात नेले.वेल्हे ग्रामीण रुग्णालयात डॉक्टरांनी तपासणी करून विकासला मृत घोषित केले. या घोषणेनंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला.

घटनेची माहिती मिळताच वेल्हे पोलिसांनी तात्काळ कारवाई करत घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी गुन्हा दाखल करून 15 वर्षीय अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळी तपास करून महत्त्वाचे पुरावे गोळा केले आहेत.या घटनेमुळे राजगड परिसरात शोककळा पसरली असून पोलिसांकडून पुढील तपास वेगाने सुरू आहे.