शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांच्या स्वागताला आल्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, विद्यार्थी भारावले…

पुणे : ‘शाळा प्रवेशोत्सव २०२६’ निमित्त मावळ तालुक्यातील पीएम श्री आदर्श केंद्र जिल्हा परिषद शाळेला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधला. यावेळी त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी आमदार सुनील शेळके देखील उपस्थित होते.

यावेळी सुनेत्रा पवार म्हणाल्या, भावी पिढी घडवण्यासाठी विद्यार्थ्यांना आधुनिक आणि दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देण्याबरोबरच प्रत्येक शाळेत आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करणं ही राज्य शासनाची नैतिक जबाबदारी आहे. त्याच अनुषंगानं आज शालेय साहित्यांचं वाटप केलं, जिल्ह्यातील ३०३ केंद्रप्रमुखांना टॅबचं वाटप करण्यात आलं असून त्यापैकी चार जणांना प्रातिनिधिक स्वरूपात टॅब प्रदान करण्यात आले.
या शाळेची विद्यार्थिनी रुद्रा गणेश राजगुरे हिनं चाचणी परीक्षेत यश संपादन करून नासाला भेट दिली. ही अत्यंत अभिमानास्पद आणि स्तुत्य बाब आहे. तिचं मनःपूर्वक अभिनंदन केलं तसंच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. प्रत्येक शाळेत डिजिटल क्लासरूम, दर्जेदार पाठ्यपुस्तकं आणि आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन सातत्यानं प्रयत्नशील आहे.

तसेच अभ्यासाबरोबरच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनीही क्रीडा क्षेत्रात यश संपादन करून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पदकं मिळवावीत, यासाठी प्रत्येक तालुक्यात चांगली क्रीडांगणं उभारण्यासह खेळाडूंना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत.विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागू नये यासाठी विशेष दक्षता घेण्यात येत आहे.

तसंच शिक्षकांनीही विद्यार्थ्यांना दर्जेदार ज्ञान देण्याच्या दृष्टीनं अध्यापन करावं, असं आवाहन यावेळी केलं. आजचं युग हे स्पर्धेचं आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचं (AI) युग आहे. या बदलत्या काळात शहरी भागातील विद्यार्थ्यांप्रमाणेच ग्रामीण भागातील विद्यार्थीही कुठंही मागं राहू नये, यासाठी शासनाकडून सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत.