सिद्धनाथ दर्शनावरून परतताना काळाचा घाला; विहिरीत कोसळलेल्या पिकअपमुळे १४ जणांचा दुर्दैवी मृत्यू

Your message has been sent
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात रविवारी संध्याकाळी घडलेल्या भीषण अपघाताने संपूर्ण राज्य हादरले आहे. म्हसवड-पंढरपूर मार्गावरील तांदूळवाडी परिसरात भाविकांना घेऊन जाणारे पिकअप वाहन रस्त्यालगतच्या विहिरीत कोसळल्याने १४ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांचाही समावेश असल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पंढरपूर तालुक्यातील रांजणी गावातील काही भाविक म्हसवड येथील सिद्धनाथ मंदिराच्या दर्शनासाठी गेले होते. दर्शन आटोपून गावाकडे परतत असताना तांदूळवाडीजवळ त्यांच्या पिकअप वाहनाचा भीषण अपघात झाला. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने गाडी थेट रस्त्याशेजारी असलेल्या विहिरीत कोसळल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
अपघातग्रस्त विहीर पाण्याने पूर्ण भरलेली असल्याचे सांगितले जात आहे. तसेच विहिरीभोवती आवश्यक सुरक्षा कठडे नसल्याची चर्चा स्थानिकांकडून होत आहे. वाहन विहिरीत पडताच प्रवाशांना बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही. त्यामुळे मोठी जीवितहानी झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस, महसूल प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन पथक आणि स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. रात्री उशिरापर्यंत मृतदेह आणि जखमींचा शोध घेण्याचे काम सुरू होते. काही जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आल्याची माहितीही समोर आली आहे.
या दुर्घटनेत चार महिला आणि चार लहान मुलांचा समावेश असल्याचे प्राथमिक वृत्त आहे. अपघाताची बातमी समजताच मृतांच्या नातेवाईकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून गावांमध्ये शोकमय वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, प्रशासनाने अपघाताच्या कारणांचा सखोल तपास सुरू केला आहे. वाहनाचा वेग, चालकाची स्थिती, रस्त्याची परिस्थिती तसेच विहिरीभोवतीच्या सुरक्षाव्यवस्थेची चौकशी केली जाणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. या दुर्घटनेमुळे ग्रामीण भागातील रस्त्यांलगत असलेल्या उघड्या विहिरींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.