‘लाडकी बहीण’ला महिलांचाच नकार! जळगावात 2 हजार अर्जांनी खळबळ; कारण समोर येताच सर्वांनाच धक्का


जळगाव : राज्यभर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी महिलांची धावपळ सुरू असतानाच जळगाव जिल्ह्यात एक वेगळेच चित्र समोर आले आहे. तब्बल दोन हजार महिलांनी स्वखुशीने लाडकी बहीण योजनेचा लाभ बंद करण्याची मागणी करत महिला व बालविकास विभागाकडे अर्ज दाखल केले आहेत. शासनाने कोणतीही कारवाई करण्यापूर्वीच या महिलांनी स्वतःहून हा निर्णय घेतल्याने जिल्ह्यात या घटनेची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. या निर्णयामागे आर्थिक कारण नसून शासनाच्या योजनांमधील नियम महत्त्वाचे ठरले आहेत.

जिल्ह्यातील या महिलांचे संजय गांधी निराधार योजनेचे अर्ज मंजूर झाले आहेत. मात्र, शासनाच्या विद्यमान नियमांनुसार एका लाभार्थ्याला एकाचवेळी दोन्ही योजनांचा लाभ घेता येत नाही. त्यामुळे कोणती योजना सुरू ठेवायची, याचा निर्णय महिलांना घ्यावा लागला. अनेकांनी संजय गांधी निराधार योजनेचा पर्याय स्वीकारत लाडकी बहीण योजनेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांनी अधिकृतपणे महिला व बालविकास विभागाकडे अर्ज सादर केले आहेत.

दुसरीकडे, राज्यभर लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांची मोठ्या प्रमाणावर पडताळणी सुरू आहे. सुरुवातीला मोठ्या प्रमाणात अर्ज मंजूर झाल्यानंतर आता निकषांची कठोर अंमलबजावणी करण्यात येत आहे. ई-केवायसी अपूर्ण असणे, वार्षिक उत्पन्नाची अट, चारचाकी वाहनाची नोंद, तसेच इतर शासकीय योजनांचा लाभ अशा विविध कारणांमुळे लाखो महिलांचे लाभ थांबले आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी लाभार्थी नाराजी व्यक्त करत असून, योजना सुरू ठेवण्यासाठी शासकीय कार्यालयांमध्ये गर्दी वाढली आहे.

जळगावमध्येही अशीच परिस्थिती पाहायला मिळत आहे. काही महिलांनी ई-केवायसी पूर्ण करूनही त्यांच्या खात्यात अनुदान जमा झाले नसल्याची तक्रार केली आहे. त्यामुळे त्या वारंवार संबंधित कार्यालयात जाऊन पाठपुरावा करत आहेत. जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी ऋषिकेश काळे यांनी दोन हजार महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ बंद करण्यासाठी अर्ज दिल्याची माहिती दिली. त्यामुळे एका बाजूला लाभ मिळवण्यासाठी संघर्ष सुरू असताना, दुसऱ्या बाजूला दुसऱ्या योजनेचा लाभ मिळावा म्हणून महिलांनी लाडकी बहीण योजनेलाच नकार दिल्याचे दुर्मिळ चित्र जळगावमध्ये पाहायला मिळत आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!