राजकारण, उद्योग आणि सेलिब्रिटींची एकाच छताखाली हजेरी! पार्थ पवार–कायनात दारा यांच्या साखरपुड्याची राज्यभर चर्चा

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यसभा खासदार पार्थ पवार आणि कायनात दारा आज अधिकृतपणे आयुष्याच्या नव्या प्रवासाची सुरुवात करत आहेत. पुण्यातील येरवडा येथील आलिशान द रिट्झ-कार्लटन हॉटेलमध्ये संध्याकाळी साडेसहा वाजता दोघांचा साखरपुडा पार पडणार असून, या सोहळ्याकडे राज्यातील राजकीय वर्तुळासह उद्योगक्षेत्राचेही लक्ष लागले आहे.
हा समारंभ पूर्णपणे खासगी स्वरूपात आयोजित करण्यात आला असून, फक्त निमंत्रित पाहुण्यांनाच प्रवेश देण्यात आला आहे. मात्र पाहुण्यांच्या यादीतील दिग्गज नावांमुळे हा कौटुंबिक कार्यक्रमही चर्चेचा विषय ठरला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व 40 आमदार, पक्षाचे वरिष्ठ नेते आणि विविध पक्षांतील सुमारे 15 खासदार या सोहळ्याला उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार सुनील तटकरे, भाजपचे खासदार निशिकांत दुबे, राज्यसभा खासदार आणि लेखिका सुधा मूर्ती, सी. एम. रमेश तसेच उद्योजक मोहित कंबोज यांच्यासह अनेक मान्यवरांना निमंत्रण देण्यात आले आहे. त्यामुळे हा साखरपुडा केवळ कौटुंबिक न राहता राजकीयदृष्ट्याही महत्त्वाचा ठरत आहे.


दरम्यान, पार्थ पवार आणि कायनात दारा यांचा विवाह 27 फेब्रुवारी 2027 रोजी बारामती येथे पार पडणार आहे. आजचा साखरपुडा हा त्या भव्य विवाहसोहळ्याची औपचारिक सुरुवात मानला जात आहे.
मूळच्या चंदीगडच्या असलेल्या कायनात दारा सध्या दिल्लीत वास्तव्यास आहेत. गेल्या काही महिन्यांत त्या पार्थ पवार यांच्यासोबत अनेक सार्वजनिक आणि कौटुंबिक कार्यक्रमांमध्ये दिसल्या होत्या. मध्य प्रदेशातील महाकाल मंदिरात दोघांनी एकत्र दर्शन घेतल्याचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. त्यानंतर त्यांच्या नात्याबाबत विविध चर्चा रंगल्या होत्या.
पवार कुटुंबातील रेवती सुळे यांच्या विवाह सोहळ्यातही कायनात दारा यांनी सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांच्यासोबत प्रवेश केला होता. त्या वेळी समोर आलेले फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. याशिवाय पवार कुटुंबाच्या विविध कौटुंबिक कार्यक्रमांमध्ये तसेच कठीण प्रसंगातही त्यांनी उपस्थिती लावल्याने त्यांचे कुटुंबाशी असलेले जवळचे संबंध अधोरेखित झाले होते.
आजचा साखरपुडा साधेपणात होत असला, तरी उपस्थित राहणाऱ्या राजकीय दिग्गजांमुळे आणि पार्थ पवार यांच्या आगामी विवाहाच्या पार्श्वभूमीवर हा सोहळा राज्यातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या कौटुंबिक कार्यक्रमांपैकी एक ठरला आहे. आता फेब्रुवारी 2027 मध्ये बारामतीत होणाऱ्या विवाहसोहळ्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.