‘धडाम-धूम’ बुलेटचा रुबाब उतरला! दौंड पोलिसांचा दणका; 19 मॉडिफाईड सायलेंसर जागीच जप्त


दौंड : रस्त्यावरून जाताना फटाक्यांसारखा आवाज करत दहशत निर्माण करणाऱ्या मॉडिफाईड बुलेटस्वारांना दौंड पोलिसांनी चांगलाच दणका दिला आहे. शहर आणि परिसरात ध्वनीप्रदूषणाचा त्रास वाढल्याच्या तक्रारींनंतर पोलिसांनी विशेष मोहीम राबवत 19 बुलेट आणि इतर दुचाकींवरील बेकायदेशीर मॉडिफाईड सायलेंसर जप्त केले. यासोबतच संबंधित वाहनचालकांवर मोटार वाहन कायद्यानुसार दंडात्मक कारवाईही करण्यात आली.

गेल्या काही काळापासून दौंड शहरात अनेक युवकांकडून बुलेट आणि इतर दुचाकींमध्ये मूळ कंपनीचे सायलेंसर काढून त्याऐवजी मोठा आणि कर्णकर्कश आवाज करणारे मॉडिफाईड सायलेंसर बसवले जात होते. या वाहनांचा आवाज इतका मोठा होता की, रस्त्यांवरील नागरिक, शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक तसेच रुग्णालयातील रुग्णांनाही त्याचा त्रास सहन करावा लागत होता.

विशेष म्हणजे, रात्री उशिरापर्यंत शहरातील मुख्य रस्ते आणि निवासी भागात अशा वाहनांची वर्दळ वाढल्याने अनेक नागरिकांनी पोलीस प्रशासनाकडे तक्रारी केल्या होत्या. सार्वजनिक शांतता आणि सुव्यवस्थेला बाधा पोहोचत असल्याने अखेर पोलिसांनी कठोर पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला.

पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या मोहिमेदरम्यान विविध चौक आणि प्रमुख मार्गांवर तपासणी नाके उभारण्यात आले. संशयित वाहनांची बारकाईने तपासणी करण्यात आली. यावेळी 19 वाहनांमध्ये नियमबाह्य सायलेंसर आढळून आले. पोलिसांनी हे सायलेंसर जागीच काढून जप्त केले आणि वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई केली.

कारवाईदरम्यान अनेक वाहनचालकांनी सायलेंसर बदलल्याची कबुली दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. काही जणांनी केवळ स्टाईल आणि आकर्षणासाठी असे बदल केल्याचे सांगितले, मात्र पोलिसांनी कोणतीही दयामाया न दाखवता नियमांनुसार कारवाई केली.

पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी स्पष्ट इशारा देताना सांगितले की, वाहनांमध्ये बेकायदेशीर बदल करून ध्वनीप्रदूषण करणाऱ्यांविरोधात यापुढेही अशाच प्रकारच्या धडक कारवाया सुरू राहतील. नियम मोडणाऱ्यांवर दंडासह कायदेशीर कारवाई केली जाईल.

दरम्यान, या कारवाईमुळे दौंडमधील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि रुग्णालय परिसरातील रहिवाशांनी पोलिसांच्या या मोहिमेचे स्वागत केले असून ‘आवाजाच्या दहशती’पासून दिलासा मिळाल्याची भावना व्यक्त केली आहे. शहरात शांतता आणि शिस्त राखण्यासाठी अशा कारवाया सातत्याने सुरू ठेवाव्यात, अशी मागणीही नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!