“मी रोहितला शेतकऱ्यांच्या ओटीत टाकलंय”; राजेंद्र पवार भावूक, सरकारवरही साधला निशाणा


पंढरपूर : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे आमदार रोहित पवार यांनी पंढरपूरमध्ये सुरू केलेल्या अन्नत्याग आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे. राज्यभरातील शेतकऱ्यांचे लक्ष वेधून घेणाऱ्या या आंदोलनाला विविध स्तरांतून पाठिंबा मिळत असून, शनिवारी रोहित पवार यांचे वडील राजेंद्र पवार यांनी आंदोलनस्थळी भेट देत मुलाच्या भूमिकेचे समर्थन केले.

माध्यमांशी संवाद साधताना राजेंद्र पवार भावूक झाले. “मी जरी रोहितचा बाप असलो तरी त्याला शेतकऱ्यांच्या ओटीत टाकलंय. त्यामुळे शेतकरी हाच त्याचा खरा बाप आहे,” असे वक्तव्य त्यांनी केले. रोहित पवार यांनी सुरू केलेले आंदोलन हे कोणत्याही वैयक्तिक फायद्यासाठी नसून सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

राजेंद्र पवार यांनी सरकारवरही टीकेची झोड उठवली. “शेतकरी, नागरिक किंवा समाजातील कोणताही घटक आपला आवाज उठवणार नसेल, तर सरकारला जाग येणार नाही. सरकार सध्या त्यांच्या धुंदीत धुंद आहे,” असा हल्लाबोल त्यांनी केला. राज्यातील शेतकऱ्यांनी आपल्या-आपल्या गावात, तालुक्यात आणि जिल्ह्यात प्रश्नांबाबत आवाज उठवण्याचे आवाहनही त्यांनी केले.

दरम्यान, रोहित पवार यांनी आंदोलनातून माघार घेण्यास स्पष्ट नकार दिला आहे. सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीच्या निर्णयामध्ये काही जाचक अटी असल्याचा आरोप त्यांनी केला. 2019 मधील लाभार्थी शेतकऱ्यांना केवळ 50 हजार रुपयांपर्यंत लाभ मर्यादित ठेवणे तसेच प्रोत्साहन अनुदानासाठी आगामी पीक कर्जाची अट घालणे या दोन अटींमुळे सुमारे 37 लाख शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहतील, असा दावा त्यांनी केला.

“या अन्यायकारक अटी तत्काळ रद्द कराव्यात. जोपर्यंत सरकार या अटी मागे घेत नाही, तोपर्यंत अन्नत्याग आंदोलन सुरूच राहील,” असा निर्धार रोहित पवार यांनी व्यक्त केला आहे.

पंढरपूरातील आंदोलनस्थळी शेतकऱ्यांची उपस्थिती वाढत असून, सरकार या मागण्यांवर कोणती भूमिका घेते याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!