पुणेकरांनो लक्ष द्या! ‘या’ तारखेपासून 14 दिवस जमावबंदी; काय सुरू, काय बंद? जाणून घ्या…


पुणे : पुणे शहरात विविध राजकीय पक्षांचे कार्यक्रम, सामाजिक संघटनांचे मोर्चे आणि आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. शहरातील कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी 9 जूनपासून पुढील 14 दिवसांसाठी प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात येणार आहेत. या काळात अनेक सार्वजनिक उपक्रमांवर निर्बंध असणार असून नागरिकांनी नियमांचे पालन करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

पोलीस उपायुक्त डॉ. प्रशांत अमृतकर यांनी यासंदर्भातील आदेश जारी केले आहेत. हे आदेश 9 जून रोजी मध्यरात्री 1 वाजल्यापासून लागू होऊन 22 जूनच्या मध्यरात्रीपर्यंत प्रभावी राहतील. या कालावधीत पोलीस आयुक्तांची पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येऊन सभा, मेळावे, मोर्चे किंवा मिरवणुका आयोजित करता येणार नाहीत.

मात्र, शासकीय कर्तव्य बजावणारे अधिकारी व कर्मचारी यांना या आदेशातून सूट देण्यात आली आहे. तसेच खासगी सुरक्षा रक्षक, गुरखा आणि चौकीदार यांनाही निर्बंधांमधून वगळण्यात आले आहे.

आदेशानुसार सार्वजनिक ठिकाणी स्फोटक पदार्थ, ज्वलनशील द्रव्ये तसेच तलवारी, भाले, काठ्या, बंदुका किंवा इजा पोहोचवू शकणारी अन्य हत्यारे बाळगण्यास मनाई करण्यात आली आहे. याशिवाय कोणत्याही व्यक्ती, नेते किंवा संघटनांचे प्रतीकात्मक पुतळे, प्रतिमा किंवा प्रेतांचे प्रदर्शन आणि दहन करण्यासही परवानगी दिली जाणार नाही.

तसेच सार्वजनिक ठिकाणी अश्लील किंवा आक्षेपार्ह घोषणा देणे, गाणी गाणे, वाद्य वाजवणे आणि समाजात तणाव निर्माण करणारी भाषणे करणे यावरही बंदी असणार आहे. सभ्यता आणि शालीनतेला बाधा पोहोचवणारे फलक, चित्रे किंवा चिन्हांचे प्रदर्शन करण्यासही मनाई करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे, गुन्हेगारी कृत्यांचे समर्थन करणारे किंवा गुन्हेगारांचे उदात्तीकरण करणारे व्हिडिओ, रिल्स आणि सोशल मीडिया पोस्ट तयार करून प्रसारित करण्यावरही पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. अशा माध्यमांतून दहशत निर्माण करणे किंवा धमकी देण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.

या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात महाराष्ट्र पोलिस अधिनियमाच्या कलम 135 अंतर्गत कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!