हायवेवर चालणाऱ्या काळ्या जाळ्याचा पर्दाफाश! रांजणगाव लॉजवर ATS ची धडक कारवाई; ७ महिलांची सुटका, ३ बांगलादेशी असल्याचा धक्कादायक खुलासा


शिरूर : पुणे–नगर महामार्गावर रांजणगाव (ता. शिरूर) परिसरात चालणाऱ्या अवैध देहव्यापार रॅकेटवर दहशतवाद विरोधी शाखा (ATS) आणि रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी टाकलेल्या अचानक छाप्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. कारेगाव येथील फर्निचर दुकानाशेजारील लॉजवर झालेल्या या धडक कारवाईत ७ पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून संपूर्ण परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी अतिशय गोपनीय पद्धतीने ही कारवाई आखली होती. पोलीस अधीक्षक संदीप गिल्ल यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक भूषण माने आणि ATS पथकाने लॉजवर अचानक धाड टाकत संपूर्ण रॅकेट उघड केले.

छाप्यादरम्यान ७ महिलांची सुटका करण्यात आली असून त्यापैकी ३ महिला बांगलादेशी असल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. या महिलांना आर्थिक फसवणूक, आमिष आणि असहाय्य परिस्थितीचा गैरफायदा घेत या अवैध व्यवसायात ओढण्यात आले होते, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. सुटका करण्यात आलेल्या सर्व महिलांना तात्काळ महिला सुधारगृहात हलवण्यात आले आहे.

या प्रकरणात पोलिसांनी लुतफ्फर मुज्जमलहक शेख (वय ४५, मूळ रा. पश्चिम बंगाल) याला अटक केली असून बबलू साहू (मूळ रा. ओडिशा) हा मुख्य आरोपी फरार झाला आहे. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत.

तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, हा संपूर्ण रॅकेट केवळ एका ठिकाणापुरता मर्यादित नसून त्याचे जाळे इतर राज्यांपर्यंत पसरलेले असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. फरार आरोपी बबलू साहू याच्यावर यापूर्वीही अशाच प्रकारचे गंभीर गुन्हे नोंद असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

दरम्यान, या कारवाईनंतर रांजणगाव परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांनी अशा अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. ATS आणि स्थानिक पोलिसांचा पुढील तपास सुरू असून या रॅकेटमागील इतर सूत्रधारांचा शोध वेगाने घेतला जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!