रक्ताच्या नात्यालाच तडा! जुन्नरमध्ये मुलाकडून वडील आणि सख्ख्या भावाची निर्घृण हत्या; गाव हादरवणारे दुहेरी हत्याकांड

जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात बुधवारी सकाळी उघडकीस आलेल्या एका दुहेरी हत्याकांडाने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. एका मुलानेच आपल्या वडिलांसह सख्ख्या भावाचा झोपेत दगडाने ठेचून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कौटुंबिक वादातून घडलेल्या या रक्तरंजित घटनेमुळे बगाडवाडी परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी संशयित आरोपीला ताब्यात घेत तपास सुरू केला आहे.

जुन्नर तालुक्यातील पारगाव तर्फे मढ गाव हद्दीतील बगाडवाडी परिसरात तळेरान गावच्या शिवारात मुकने कुटुंब वास्तव्यास होते. या कुटुंबात राहणारे जयराम महादू मुकने (वय 60) आणि त्यांचा मुलगा राजेंद्र जयराम मुकने (वय 27) यांचा मृतदेह बुधवारी सकाळी घरात रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला. प्राथमिक तपासात या दोघांची हत्या जयराम यांचा मोठा मुलगा बाबजी जयराम मुकने (वय 33) याने केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जयराम मुकने, त्यांचे दोन्ही मुलगे बाबजी आणि राजेंद्र हे एकाच झोपडीवजा घरात राहत होते. मंगळवारी रात्री कुटुंबातील सदस्यांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला होता. हा वाद संपल्यानंतर सर्वजण झोपले. मात्र, मध्यरात्रीनंतर बाबजीने रागाच्या भरात झोपेत असलेल्या वडिलांवर आणि भावावर मोठ्या दगडाने हल्ला केल्याचा संशय आहे.

या हल्ल्यात दोघांचाही जागीच मृत्यू झाला. विशेष म्हणजे, हत्येनंतर आरोपी घटनास्थळावरून फरार न होता त्याच घरात मृतदेहांच्या शेजारी झोपल्याची माहिती स्थानिकांकडून समोर आली आहे. सकाळी परिसरातील नागरिकांनी घरात संशयास्पद परिस्थिती पाहिल्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली.

घटनेची माहिती मिळताच ओतूर पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून दोन्ही मृतदेह ताब्यात घेतले असून शवविच्छेदनासाठी ओतूर प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवले आहे. सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगिरे यांनी घटनेला दुजोरा दिला असून प्राथमिक चौकशीत कौटुंबिक वादातून हे हत्याकांड घडल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
स्थानिकांच्या माहितीनुसार पोलिसांनी संशयित बाबजी मुकने याला ताब्यात घेतले आहे. त्याची सखोल चौकशी सुरू असून नेमका वाद कशावरून झाला, हत्या पूर्वनियोजित होती का आणि त्यामागे इतर काही कारणे होती का, याचा तपास सुरू आहे.
दरम्यान, एका मुलानेच आपल्या जन्मदात्या वडिलांचा आणि सख्ख्या भावाचा जीव घेतल्याच्या घटनेने संपूर्ण जुन्नर तालुका हादरला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. ओतूर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.