अखेर शेतकरी कर्जमाफीवर शिक्कामोर्तब! कॅबिनेट बैठकीत मान्यता; लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा..

मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी समोर येत आहे. शेतकरी कर्जमाफी योजनेला मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी मिळाली असून दोन लाख रुपयांपर्यंतचे पीककर्ज माफ करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे. मात्र, विधानपरिषद निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्याने या निर्णयाची अधिकृत घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही.

गेल्या अनेक महिन्यांपासून शेतकरी कर्जमाफीची मागणी करत होते. विविध संघटनांकडून आंदोलनेही करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कर्जमाफीचा प्रस्ताव मंजूर केल्याची चर्चा सुरू झाली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, राज्यातील सुमारे 56 लाख शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळू शकतो. दोन लाख रुपयांपर्यंतचे थकीत कर्ज माफ करण्याबरोबरच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर आर्थिक मदत देण्याचाही विचार सरकारकडून करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

विधानपरिषद निवडणुकीनंतर या योजनेची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता असून, त्यानंतर लाभार्थी, अटी व शर्थी याबाबत सविस्तर माहिती जाहीर केली जाईल. मान्सूनच्या तोंडावर शेतकऱ्यांना दिलासा देणारा हा निर्णय ठरू शकतो, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
