पुढील 24 तास धोक्याचे! अतिमुसळधार पाऊस, विजांचा कडकडाट अन् वादळी वाऱ्यांचा हवामान विभागाचा इशारा


नवी दिल्ली : मान्सूनचे अधिकृत आगमन होण्यापूर्वीच देशातील अनेक राज्यांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली असून काही ठिकाणी परिस्थिती गंभीर बनली आहे. मुसळधार पाऊस, वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभागाने  अनेक राज्यांसाठी अतिवृष्टीचा इशारा जारी केला आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार दिल्ली, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, राजस्थान, पंजाब आणि हरियाणा या राज्यांमध्ये पुढील काही तासांत पावसाची शक्यता आहे. तर मध्य प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र, बिहार, केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

गेल्या काही दिवसांत उत्तर प्रदेशमध्ये वादळी वारे आणि मुसळधार पावसामुळे मोठे नुकसान झाले असून अनेक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

हवामान खात्याच्या माहितीनुसार पुढील 8 ते 24 तास अत्यंत महत्त्वाचे असून अनेक भागांत विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडू शकतो. काही ठिकाणी वाऱ्याचा वेग ताशी 70 ते 90 किलोमीटरपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. त्यामुळे झाडे उन्मळून पडणे, वीजपुरवठा खंडित होणे आणि वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

दरम्यान, नैऋत्य मोसमी वारे हळूहळू पुढे सरकत असून पुढील काही दिवसांत ते बंगालच्या उपसागराच्या आणखी भागांमध्ये आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. यामुळे देशातील अनेक भागांमध्ये पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

हवामान विभागाने नागरिकांना विनाकारण घराबाहेर न पडण्याचा, सुरक्षित ठिकाणी राहण्याचा आणि स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचा सल्ला दिला आहे. आगामी तीन ते चार दिवस देशातील अनेक भागांसाठी आव्हानात्मक ठरण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!