आळंदीच्या माऊली मंदिरातच ‘विश्वासघात’! दानपेटीची चावी चोरट्या सेवेकऱ्याकडे; देवस्थानची धक्कादायक कबुली


आळंदी : जिथे लाखो वारकरी डोळ्यांत भक्ती आणि हातात श्रद्धा घेऊन माऊलींच्या चरणी नतमस्तक होतात, त्याच आळंदीतील श्री संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरात आता सुरक्षेच्या नावाने मोठा भोंगळ कारभार उघडकीस आला आहे. मंदिराच्या मुख्य दानपेटीतून लाखो रुपयांची रोकड लंपास झाल्याच्या प्रकरणात धक्कादायक खुलासा समोर आला असून, दानपेटीची चावी आणि रोकड जमा करण्याची जबाबदारी थेट एका अनधिकृत सेवेकऱ्याकडे देण्यात आल्याची कबुली देवस्थान प्रशासनानेच दिली आहे.

या प्रकरणात विशाल वारुळे नावाचा सेवेकरी संशयाच्या भोवऱ्यात अडकला आहे. विशेष म्हणजे, तो देवस्थानचा अधिकृत कर्मचारी नसतानाही मुख्य दानपेटी उघडणे, त्यातील रक्कम जमा करणे आणि व्यवहार हाताळण्याचे काम करत होता. ही बाब समोर आल्यानंतर मंदिर प्रशासनाच्या सुरक्षेवर आणि अंतर्गत व्यवस्थापनावर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

देवस्थानचे विश्वस्त राजेंद्र उमाप यांनी माध्यमांशी बोलताना या गंभीर हलगर्जीपणाची कबुली दिली. मंदिरातील आर्थिक व्यवहार आणि दानपेटी व्यवस्थापनात आवश्यक नियम व सुरक्षा प्रक्रिया पाळल्या गेल्या नसल्याचं त्यांनी मान्य केलं. कोट्यवधी रुपयांची उलाढाल असलेल्या आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मंदिरात असा निष्काळजीपणा कसा झाला, यावरून वारकरी आणि ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

या चोरीच्या प्रकरणानंतर देवस्थान प्रशासनाने तातडीने कारवाईचा बडगा उगारला आहे. मुख्य कॅशियर महेश गोखले, मंदिर व्यवस्थापक, प्रशासकीय अधिकारी आणि मुख्य आचारी यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावण्यात आली आहे. संबंधित अधिकाऱ्यांकडून लेखी खुलासा मागवण्यात आला असून, या संपूर्ण प्रकरणाची अंतर्गत चौकशी सुरू करण्यात आली आहे.

दरम्यान, आळंदीतील ग्रामस्थ, वारकरी प्रतिनिधी आणि देवस्थान प्रशासनाची महत्त्वाची बैठक पार पडली. भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी मंदिरात कठोर नियमावली लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मंदिरातील प्रत्येक सेवेकरी आणि कर्मचाऱ्यांची पार्श्वभूमी तपासली जाणार असून, दानपेटी व्यवस्थापनासाठी स्वतंत्र नियंत्रण प्रणाली उभारली जाणार आहे. तसेच सीसीटीव्ही देखरेख, रोकड व्यवहारांवर विशेष नियंत्रण आणि सुरक्षारक्षकांची संख्या वाढवण्याबाबतही चर्चा झाली.

मात्र, भाविक आणि स्थानिक नागरिक केवळ नोटीस देऊन प्रशासनाने हात झटकू नये, अशी मागणी करत आहेत. लाखो भाविकांच्या श्रद्धेच्या पैशांवर डल्ला मारणाऱ्यांसह निष्काळजीपणा करणाऱ्या सर्व जबाबदारांवर कठोर कायदेशीर कारवाई व्हावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

माऊलींच्या पवित्र मंदिरात घडलेल्या या प्रकारामुळे केवळ चोरीच नव्हे, तर देवस्थान व्यवस्थापनाच्या पारदर्शकतेवर आणि सुरक्षेवरही मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!