कांदा आंदोलनावरून देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा! “कांदा कापल्यावरही अश्रू येत नाहीत…”

मुंबई : राज्यात इंधन दरवाढ, तुटवडा आणि कांद्याच्या प्रश्नावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडींचे पडसाद महाराष्ट्रात उमटताना दिसत असून पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे. काही जिल्ह्यांमध्ये इंधन तुटवड्याच्या चर्चांमुळे चिंता व्यक्त केली जात असतानाच आता कांद्याच्या मुद्द्यावरून सरकार आणि विरोधक आमनेसामने आले आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कांद्याच्या दरवाढीबाबत मोठे विधान करत विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. केंद्र सरकारकडून कांद्याच्या दरात वाढ करण्यात आल्याचे सांगत त्यांनी काही लोक विनाकारण या विषयावर राजकारण करत असल्याचा आरोप केला. कांदा प्रश्नावर उद्या दिल्लीत महत्त्वाची बैठक होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
विरोधकांचे आंदोलन हे पूर्णपणे राजकीय असल्याचा आरोप करत फडणवीस म्हणाले की, कांद्याच्या दरात कालच केंद्राकडून 3.50 पैसे वाढ करण्यात आली. कांदा प्रश्नी उद्या संध्याकाळी दिल्लीत बैठक होणार आहे. काही लोक विनाकारण यासंदर्भात राजकारण करु पाहतायत. तुमच्या काळात कांद्याचा दराचा प्रश्न होता.

विरोधकांचं आंदोलन राजकीय आंदोलन असल्याचेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. पुढे त्यांनी म्हटले की, कांदा कापल्यावर अश्रू येणार नाही अशी लोक आंदोलन करतायत. उद्या दिल्लीत कांद्यासंदर्भात बैठक आहे. कांदा कापल्यावरही विरोधकांच्या डोळ्यात अश्रू येणार नाहीत, असेही त्यांनी म्हणत जोरदार टीका केली.

दरम्यान, कांद्याच्या मुद्द्यावर आमदार रोहित पवार आक्रमक भूमिका घेत आहेत. त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली. रोहित पवार यांनी नुकताच यावर म्हटले की, शेतकऱ्यांच्या कांद्याला हमीभाव मिळावा म्हणून आज शेतकऱ्यांची एकजूट झाली. शेतकरी संघटनेसह विरोधी पक्षाचे नेते उपस्थित आहे. कांद्याला 5 ते सहा रुपये भाव मिळत आहे. हा दर परवडणारा नाही 18 रुपये उत्पादन खर्च आहे. आता कांद्या प्रकरणात दिल्लीमध्ये महत्वाची बैठक पार पडणार आहे.