पालकांनो सावधान! वाढत्या उष्णतेचा मुलांच्या डोळ्यांवर गंभीर परिणाम; ‘या’ गोष्टींकडे दुर्लक्ष ठरू शकतं धोकादायक

पुणे : राज्यात वाढत्या उष्णतेसोबतच आता मुलांच्या डोळ्यांच्या समस्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. उन्हाळी सुट्ट्या सुरू झाल्यानंतर मुलांचा मोबाईल, टीव्ही आणि टॅबसमोर घालवला जाणारा वेळ मोठ्या प्रमाणात वाढला असून त्याचा थेट परिणाम डोळ्यांवर होत असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे.

याशिवाय तीव्र सूर्यप्रकाश, धूळ, उष्णतेच्या लाटा आणि स्विमिंग पूलमधील क्लोरीनयुक्त पाण्यामुळेही मुलांच्या डोळ्यांचे आरोग्य धोक्यात येत आहे.
तज्ज्ञांच्या माहितीनुसार, उन्हाळ्यातील UV-A आणि UV-B किरणांचा मुलांच्या डोळ्यांवर गंभीर परिणाम होऊ शकतो. यामुळे डोळे लाल होणे, खाज सुटणे, जळजळ होणे आणि पाणी येणे अशा समस्या वाढत आहेत.

काही प्रकरणांमध्ये रेटिनालाही धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे दुपारच्या वेळेत मुलांना थेट उन्हात जाणे टाळावे आणि बाहेर जाताना कॅप, स्कार्फ तसेच UV संरक्षण असलेले सनग्लासेस वापरावेत, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

दरम्यान, सतत एसी किंवा पंख्याखाली राहिल्यामुळे डोळे कोरडे पडण्याच्या तक्रारीही वाढत आहेत. डोळ्यांत खडबडीतपणा, चिडचिड आणि वारंवार डोळे चोळण्याची सवय मुलांमध्ये दिसून येत आहे. काही मुलांमध्ये ॲलर्जीचाही त्रास वाढत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
उन्हाळी सुट्ट्यांमध्ये स्विमिंग पूल आणि वॉटर पार्कमध्ये जाणाऱ्यांची संख्या वाढते. मात्र अस्वच्छ पाणी आणि क्लोरीनमुळे डोळ्यांचे संसर्ग, कंजंक्टिव्हायटिस आणि कॉर्नियल इन्फेक्शनचा धोका वाढत असल्याचा इशाराही तज्ज्ञांनी दिला आहे. त्यामुळे पोहताना स्वच्छ पूल निवडणे आणि दर्जेदार स्विमिंग गॉगल्स वापरणे महत्त्वाचे असल्याचे सांगितले जात आहे.
याशिवाय वाढत्या स्क्रीन टाइममुळे डिजिटल आय स्ट्रेनच्या समस्या झपाट्याने वाढत आहेत. सतत मोबाईल किंवा टीव्हीकडे पाहिल्यामुळे डोळे कोरडे पडणे, धूसर दिसणे, डोकेदुखी आणि मायोपियाचा धोका वाढत असल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे पालकांनी मुलांचा स्क्रीन टाइम मर्यादित ठेवून त्यांना मैदानी खेळ, वाचन आणि इतर सर्जनशील उपक्रमांकडे वळवावे, असा सल्ला दिला आहे.