कांदा आंदोलन पेटले! चांदवडमध्ये रणकंदन; रोहित पवारांसह नेते ताब्यात, महामार्ग ठप्प


नाशिक : कांद्याच्या कोसळत्या दराविरोधात राज्यातील शेतकऱ्यांचा संताप उसळला असून नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथे झालेल्या ‘आक्रोश महामोर्चा’ दरम्यान मोठा तणाव निर्माण झाला. या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. कांद्याला योग्य हमीभाव मिळावा, तसेच शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान भरपाई मिळावी या प्रमुख मागण्यांसाठी हजारो शेतकरी आणि महाविकास आघाडीचे नेते रस्त्यावर उतरले होते.

मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर चांदवड चौफुली येथे शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन करत वाहतूक पूर्णपणे ठप्प केली. कांद्याला किमान 24 रुपये हमीभाव आणि विकलेल्या कांद्यावर 15 रुपये अनुदान देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. आंदोलकांनी गळ्यात कांद्याच्या माळा घालून सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

या आंदोलनात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, शिवसेना (UBT) नेते अंबादास दानवे, राष्ट्रवादी (शरद पवार गट) आमदार रोहित पवार, शशिकांत शिंदे आणि भास्कर भगरे यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते. आंदोलकांचा प्रचंड प्रतिसाद पाहता परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले.

आंदोलनादरम्यान काही ठिकाणी परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्याचे चित्र दिसले. काही आंदोलकांनी वाहनांची हवा सोडल्याचा आणि टायर जाळल्याचा आरोप करण्यात आला. यामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आणि वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली. तब्बल दोन तासांहून अधिक काळ हा महामार्ग बंद राहिला.

परिस्थिती गंभीर झाल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत आंदोलकांची धरपकड सुरू केली. यामध्ये रोहित पवार, शशिकांत शिंदे, अंबादास दानवे आणि हर्षवर्धन सपकाळ यांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या कारवाईनंतर परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला.

आंदोलनादरम्यान बोलताना रोहित पवार यांनी सरकारवर तीव्र टीका केली. त्यांनी नाफेडच्या कांदा खरेदी धोरणावर प्रश्न उपस्थित करत शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्याचा आरोप केला. कांदा निर्यातीवरील निर्बंध आणि अपुरी खरेदी यामुळे बाजारभाव कोसळल्याचे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकार गांभीर्याने पाहत नसल्याचा आरोपही त्यांनी केला.

दुसरीकडे, सोलापूरमध्येही काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. सोलापूर-पुणे आणि सोलापूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग काही काळ बंद करण्यात आला. यावेळी केंद्र सरकारवर टीका करत शेतकऱ्यांना योग्य भाव देण्याची मागणी करण्यात आली.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर बाजार समितीत कांद्याला अत्यल्प दर मिळाल्याने शेतकऱ्यांनी कांदे रस्त्यावर फेकून निषेध व्यक्त केला. केवळ 125 ते 130 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याचे समोर आले.

संपूर्ण राज्यात कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा रोष वाढत असून विविध जिल्ह्यांत आंदोलनाची तीव्रता वाढत आहे. प्रशासनाने परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू केले असून, या प्रकरणात पुढे सरकार कोणता निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!