महाराष्ट्रात उन्हाचा महाभयंकर कहर! विदर्भ-खान्देश होरपळले; अवघ्या २४ तासांत १३ जणांचा मृत्यू, प्रशासनात खळबळ

पुणे : राज्यात मे महिन्याच्या अखेरीस उन्हाने अक्षरशः कहर केला असून विदर्भ आणि खान्देशात उष्णतेमुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. अमरावती, जळगाव आणि चंद्रपूर जिल्ह्यात उष्माघातासदृश्य घटनांमध्ये अनेकांचा मृत्यू झाल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. सतत वाढणाऱ्या तापमानामुळे नागरिक हैराण झाले असून हवामान विभागाने काही भागांना रेड अलर्ट जारी केला आहे.

अमरावती शहरात गेल्या २४ तासांत तब्बल ७ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यापैकी दोन मृत्यू अधिकृतपणे उष्माघातामुळे झाल्याची नोंद करण्यात आली असून उर्वरित मृत्यूंमागेही तीव्र उष्णतेचा फटका कारणीभूत असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. रस्त्यावर राहणारे बेघर, वृद्ध आणि बेवारस नागरिक सर्वाधिक प्रभावित होत असल्याचे समोर आले आहे.
मे महिन्यात अमरावतीचे तापमान सातत्याने ४५ अंश सेल्सिअसच्या पुढे जात असल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे. शहरातील विविध भागांत बेवारस अवस्थेत मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. शरीरातील पाण्याचे प्रमाण अचानक कमी होणे आणि उन्हात दीर्घकाळ सावली न मिळणे ही मृत्यूमागील संभाव्य कारणे असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

दरम्यान, जळगाव जिल्ह्यातही उष्णतेचा मोठा फटका बसला आहे. जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत ४ जणांचा मृत्यू झाला असून चिंचोली येथील ५७ वर्षीय सेंट्रिंग कामगाराचा उन्हात काम करताना मृत्यू झाला. याशिवाय तीन तरुणांचाही उलटी, चक्कर आणि उष्माघातासदृश्य लक्षणांमुळे मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातही तापमान ४७ अंश सेल्सिअसच्या पुढे गेल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. भद्रावती तालुक्यात एका वृद्धासह एका निराधार महिलेचा मृत्यू झाला असून उष्माघातामुळेच त्यांचा जीव गेल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. वाढत्या तापमानामुळे आरोग्य विभाग आणि प्रशासन सतर्क झाले असून नागरिकांना दुपारच्या वेळेत घराबाहेर न पडण्याचा सल्ला देण्यात आला आहे.