“कॉकरोच जनता पार्टी” प्रकरणावर सुप्रीम कोर्टात सुनावणी; तातडीची मागणी फेटाळली, ‘एवढं मनाला लावून घेऊ नका’ असा सल्ला

मुंबई : सुप्रीम कोर्टात “कॉकरोच जनता पार्टी” संदर्भातील याचिकेवर २५ तारखेला सुनावणी झाली. यावेळी ॲडव्होकेट एन. के. गोस्वामी यांनी तातडीने सुनावणी घेण्याची विनंती केली. मात्र सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी ही मागणी फेटाळत स्पष्ट केलं की हे प्रकरण तातडीचं नाही.

त्यांनी सांगितलं की “कॉकरोच जनता पार्टी” या मुद्द्याला इतकं मनाला लावून घेऊ नका आणि त्याला भावनिक स्वरूप देण्याची गरज नाही. कोर्टाने स्पष्ट केलं की सध्या या प्रकरणावर तातडीने सुनावणीची आवश्यकता नाही आणि सर्वोच्च न्यायालय योग्य वेळी याचा विचार करेल.
एका वकिलाने दाखल केलेल्या जनहित याचिकेचा उल्लेख करत अॅड. एन. के. गोस्वामी यांनी सांगितले की, सरन्यायाधीशांनी ‘झुरळ’ वक्तव्यावर स्पष्टीकरण दिले आहे. यानंतरही न्यायव्यवस्थेला बदनाम करण्यासाठी विकृत आणि द्वेषपूर्ण प्रचार सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला आणि या प्रकरणी तातडीने सुनावणी घेण्याची मागणी केली.

सरन्यायाधीश सूर्य कांत यांच्यासमोर या मुद्द्यावर चर्चा झाली असता त्यांनी पुन्हा स्पष्ट केलं की हे प्रकरण तातडीचं नाही आणि कोणतीही घाई करण्याची गरज नाही. सर्वोच्च न्यायालय योग्य वेळी यावर विचार करेल, असंही त्यांनी सांगितलं.

या प्रकरणाची पार्श्वभूमी अशी की, एका सुनावणीदरम्यान सरन्यायाधीशांनी ऑनलाईन सक्रियतेच्या नावाखाली यंत्रणेवर टीका करणाऱ्या काही तरुणांची तुलना ‘कॉकरोच’ (झुरळे) अशी केली होती. त्यानंतर सोशल मीडियावर “कॉकरोच जनता पार्टी” नावाची व्यंगात्मक मोहीम सुरू झाली होती.
ही मोहीम काही काळातच व्हायरल झाली आणि मोठ्या प्रमाणावर फॉलोअर्स मिळाले. नंतर सरन्यायाधीशांनी स्पष्ट केलं की त्यांचा रोख बनावट पदव्या असलेल्या लोकांवर होता. दरम्यान, या मोहिमेशी संबंधित काही सोशल मीडिया अकाउंट्स नंतर सस्पेंड करण्यात आली.
याच पार्श्वभूमीवर न्यायालयातील तोंडी टिप्पण्यांचा व्यावसायिक किंवा आर्थिक फायद्यासाठी वापर होऊ नये आणि बनावट वकिलांविरुद्ध सीबीआय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करणारी आणखी एक याचिका दाखल करण्यात आली आहे. मात्र सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं की हे सर्व मुद्दे तातडीचे नाहीत आणि यावर योग्य वेळीच सुनावणी होईल.