कोकण फिरायला जाणार? आधी ही बातमी वाचा; ‘या’ तारखेपासून कोकणातील पर्यटन स्थळ होणार बंद..

पुणे : कोकण किनारपट्टीवर मान्सूनची चाहूल लागताच प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण बंदर परिसरात 26 मे 2026 पासून सर्व प्रकारची प्रवासी जलवाहतूक आणि व्यावसायिक जलक्रीडा सेवा बंद ठेवण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. वाढत्या समुद्री धोक्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सागरी मंडळाने ही कारवाई केली आहे.

महाराष्ट्र सागरी मंडळाच्या आदेशानुसार 26 मे ते 31 ऑगस्ट 2026 या कालावधीत मालवण बंदर क्षेत्रातील सर्व पर्यटनविषयक जलसेवा पूर्णपणे बंद राहणार आहेत. यामध्ये सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी वाहतूक, बोटिंग, स्कूबा डायव्हिंग तसेच विविध वॉटर स्पोर्ट्सचा समावेश आहे. प्रादेशिक बंदर अधिकारी कॅप्टन एस. टी. उगालमुगले यांनी सर्व बंदर निरीक्षक आणि सहायक निरीक्षकांना याबाबत अधिकृत आदेश दिले आहेत.
‘इनलँड व्हेसल्स ॲक्ट, 1917’ अंतर्गत नोंदणीकृत सर्व बोटी आणि जलवाहनांना मान्सून काळात व्यावसायिक उपक्रम थांबवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. समुद्र खवळलेला असताना पर्यटन सुरू ठेवल्यास अपघाताचा धोका वाढू शकतो. त्यामुळे पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ही बंदी लागू करण्यात आली असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

मालवण बंदर विभागाने आदेशाची अंमलबजावणी सुरू केली असून एकूण 31 संस्था, पर्यटन सोसायट्या आणि वैयक्तिक बोट चालकांना नोटीस बजावण्यात आली आहे. यात सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी वाहतूक वेल्फेअर असोसिएशन, शिवशक्ती जलपर्यटन संस्था चिवला, तारकर्ली, देवबाग आणि दांडी येथील बोटिंग संघटनांचा समावेश आहे. स्थानिक स्कूबा डायव्हिंग व्यावसायिकांनाही नियमांचे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

दरवर्षी पावसाळ्यापूर्वी कोकण किनारपट्टीवरील जलपर्यटन सेवा बंद केल्या जातात. मागील वर्षी 20 मेपासून पर्यटन हंगाम थांबवण्यात आला होता. यावर्षी अधिकृत बंदी 26 मेपासून लागू होणार आहे. सध्या पर्यटन हंगामाचा शेवटचा टप्पा सुरू असून मालवणच्या दांडी किनाऱ्यावर पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. मात्र, हवामानातील बदल आणि पावसाळी परिस्थितीमुळे पुढील काही महिन्यांसाठी जलपर्यटन पूर्णपणे बंद राहणार आहे.