विदर्भ भाजला! नागपुरात २४ तासांत ३ जणांचा मृत्यू; उष्णतेमुळे धक्कादायक घटना..

नागपूर : विदर्भात उष्णतेचा तडाखा दिवसेंदिवस वाढत असून नागपूर अक्षरशः भाजून निघत आहे. गेल्या २४ तासांत शहरातील तापमानात मोठी वाढ झाली असून मंगळवारी नागपूरचा पारा थेट ४५.५ अंश सेल्सिअसवर पोहोचला. वाढत्या उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले असतानाच शहरात तीन संशयित उष्माघाताच्या मृत्यूंची घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे.

नागपूर शहरातील लकडगंज, गणेशपेठ आणि राणा प्रतापनगर पोलीस ठाण्यांच्या हद्दीत तीन व्यक्ती बेवारस व बेशुद्ध अवस्थेत आढळून आल्या होत्या. लकडगंज परिसरात सुमारे ४० वर्षीय पुरुष, गणेशपेठ भागात ५५ वर्षीय महिला, तर राणा प्रतापनगरमध्ये ४५ वर्षीय व्यक्ती आढळून आली. पोलिसांनी तातडीने त्यांना सरकारी रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर तिघांनाही मृत घोषित केले.
या तिघांचाही मृत्यू उष्माघातामुळे झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मात्र मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होणार असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.

दरम्यान, संपूर्ण विदर्भात सूर्याचा प्रचंड तडाखा कायम आहे. काल अकोला, अमरावती आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये तापमान ४६ अंशांच्या पुढे गेले होते. नागपूरसह अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान ४५ अंशांपेक्षा जास्त नोंदवण्यात आले. उष्णतेची तीव्रता इतकी वाढली आहे की एसी आणि कुलरसारखी साधनेही निष्प्रभ ठरत असल्याचे नागरिक सांगत आहेत.

हवामान विभागाने नागपूर, अकोला, अमरावती आणि वर्धा जिल्ह्यांसाठी विशेष अलर्ट जारी केला आहे. पुढील चार दिवस विदर्भात उष्णतेची लाट कायम राहणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांनी दुपारच्या वेळेत घराबाहेर पडणे टाळावे, भरपूर पाणी प्यावे आणि आरोग्याची विशेष काळजी घ्यावी, असा सल्ला हवामान विभागाचे शास्त्रज्ञ डॉ. श्रीकांत टी. एस. यांनी दिला आहे.
दरम्यान, या तीव्र उष्णतेदरम्यान एक दिलासादायक अंदाजही समोर आला आहे. यंदा मान्सून नेहमीपेक्षा लवकर विदर्भात दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. जूनच्या दुसऱ्या आठवड्यात मान्सूनचे आगमन होण्याची शक्यता असून त्यामुळे उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळू शकतो.