कोरेगावमूळ रेल्वे उड्डानपूलाचे काम भूसंपादन मोबदल्याअभावी ठप्प; दिड दशकाचे प्रयत्न अद्यापही अधुरे; ‘दादांच्या’ निधनानंतर प्रशासकीय यंत्रणा मंदावली..

जयदिप जाधव

उरुळीकांचन : किमान दिड दशके उड्डानपूल होऊ नये म्हणून न्यायालयीन विवादात सापडलेला व गेल्या चार महिन्यांपूर्वीच प्रशासकीय पातळीवर भूसंपादनाचा निवाडा सोडवून स्थानिक शेतकऱ्यांना भूसंपादनाचा मोबदला अदा करुन भूसंपादन क्षेत्र निश्चित करुन या अटीवर प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेल्या कोरेगावमूळ रेल्वे स्थानकावरील बहुप्रतिक्षित उड्डानपूलाचे काम शेतकऱ्यांना भूसंपादनाची रक्कम अद्याप अदा न झाल्याने पुन्हा एकदा दिरंगाईच्या भोवऱ्यात सापडले आहे.
बहुप्रतिक्षित कोरेगावमूळ रेल्वे स्थानकावर न्यायालयीन विवादात सापडलेला उड्डानपूल दिवंगत नेते अजित पवार यांच्या प्रयत्नातून स्थानिक शेतकऱ्यांच्या भूसंपादनाच्या प्रश्नात तोडगा काढून प्रशासनाकडून सुरू करण्यात आला होता.उड्डानपूलासाठी यापूर्वीच रेल्वे प्रशासनाकडून मंजूर झालेल्या निधीतून ओव्हर ब्रीज पध्दतीने या उड्डानपूलाच्या काम साकारण्यात येणार आहे.

त्यासाठी भूसंपादन क्षेत्र गट क्र. २००/१, २००/२, २०१, ३३०,३२०,४९१,४९२,४९३,४९४,४९५,४९६,१९३,१९४,१९५ हे क्षेत्र निश्चित करुन व मोबदल्याची रक्कम प्रतिक्षेत ठेऊन या पुलाच्या कामास १३ मार्च रोजी झाली आहे. मात्र भूसंपादनाचे उर्वरीत क्षेत्रावरील शेतकऱ्यांना मोबदला रेल्वे प्रशासनाकडून अद्याप न मिळाल्याने शेतकऱ्यांनी ते काम रोखले असल्याने पर्यायाने उड्डानपूलाचे काम ठप्प झाले आहे.

या दरम्यान ओव्हर ब्रीज पध्दतीने या उड्डानपूलाच्या कामासाठी दिवंगत नेते अजित पवार यांनी उड्डानपूलासाठी विरोध असलेले भूसंपादन क्षेत्र वगळून सुनियोजित पध्दतीने या ओव्हर ब्रीज पुलासाठी कामाला मंजुरी मिळून दिली होती. मात्र प्रत्यक्षात भूसंपादनासाठी राखीव केलेल्या क्षेत्रात शेतकऱ्यांनाअद्याप रक्कम न मिळाल्याने या उड्डानपूलाचे काम ठप्प झाले आहे. ठेकेदाराने हरकत नसलेल्या रस्त्यावरील क्षेत्रात पिलर उभारून काम केले आहे. मात्र उर्वरीत कामासाठी भूसंपादनाची रक्कम शेतकऱ्यांना अदा न झाल्याने या पूलाचे काम पुन्हा ठप्प झाले आहे.
दरम्यान कोरेगावमूळ उड्डानपूलाचा मार्ग बेल्हा ते पाबळ, जेजुरी या राज्य मार्गात सामाविष्ठ झाला आहे. राज्य शासनाने २८७ कोटी खर्च करुन तत्कालीन आमदार बाबुराव पाचर्णे यांच्या प्रयत्नातून तो पूर्ण झाला आहे. हायब्रीड अँन्युईटी या तत्वावर या मार्गांला मंजुरी मिळून हवेली, पुरंदर व शिरुर या तालुक्याला खऱ्या अर्थाने न्याय मिळून उच्च दर्जाचा राज्य मार्ग विकसित झाला आहे.
मात्र या मार्गावर उड्डानपूलाचे काम मार्गी न लागल्याने या प्रशस्त मार्गाची प्रगतीची कळा ओसरली आहे. हाच मुद्दा दिवंगत अजित पवार यांनी विचारात घेऊन उड्डानपूलाचा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र भूसंपादनाच्या मोबदला अदा होण्याच्या अभावी पुन्हा एकदा ठप्प झाला आहे.
” भूसंपादनाच्या प्रस्तावाची माहिती आमच्याकडे नसून रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून प्रस्तावाबाबत काय कार्यवाही झाली आहे, याचे उत्तर वरीष्ठ कार्यालय देऊ शकेल” – इंदू भूषण कुमार, रेल्वे अभियंता.
” प्रशासकीय पातळीवरुन भूसंपादनाच्या कामाचा पाठपुरावा न झाल्याने शेतकऱ्यांना मोबादला मिळण्यासाठी दिरंगाई झाली आहे. लवकरच जिल्हाधिकारीयांच्यामार्फत हा प्रश्न सोडवण्यासाठी पालकमंत्री सुनेत्रा पवार यांना प्रयागधाम शिष्टमंडळ व आम्ही भेटणार आहोत” -संतोष कांचन, संचालक यशवंत सहकारी साखर कारखाना.