सील केलेल्या मिळकतीचे कुलूप तोडून अनाधिकाराने प्रवेश; एकावर गुन्हा दाखल


लोणी काळभोर: थकीत कर्ज वसुलीसाठी सील करण्यात आलेल्या मिळकतीचे सील व कुलुप तोडून मिळकतीमध्ये अनाधिकाराने प्रवेश केला म्हणून एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी येथील अभिनव चेतना नागरी सहकारी पतसंस्थेच्या व्यवस्थापिका प्रतिभा राहुल तुपे (वय ४६, रा. मल्हार बंगला, डीपी रोड, साधुनाना तुपे वस्ती, साडेसतरा नळी, हडपसर, पुणे) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून डॅनिअल दिनकर पवार (रा. होरेबनगर, लोणी स्टेशन, कदमवाकवस्ती, एमआयटी कॉलेज जवळ, ता. हवेली) यांचेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पवार यांनी ३ जुलै २०१५ रोजी कदमवाकवस्ती येथील त्यांची व संमती देणार जोत्स्ना डॅनिअल पवार यांचे मालकीचे गट नंबर ५६९ पैकी यांचे हिस्स्याचे क्षेत्र ३.२७ आर. व त्यावरील वॉर्ड क्रमांक ३ मधील मिळकत नंबर ३/०११३८ च्या तारणावर घर दुरुस्ती, घर बांधणीसाठी पंचवीस लाख रुपये स्थावर तारण कर्ज घेतले आहे. तसेच सदर मिळकतीवर दिंनाक २१ एप्रिल रोजी त्यांचे कटुंबिय जोत्स्ना पवार व रिबेका डॅनिअल साळवी यांचे नावावर प्रत्येकी पंचवीस लाख रुपये असे एकूण पंच्याहत्तर लाख रुपये स्थावर तारण कर्ज घेतलेले आहे.

सदर कर्जाची थकबाकी झाल्यानंतर कर्जदार व जामिनदार यांना वेळोवेळी सांगून, लेखी नोटीसा देऊन देखील कर्जदार यांनी थकित रक्कमेचा भरणा केला नाही. यानंतर संस्थेने कर्ज वसुलीसाठी सदर कर्जदार व जामिनदार यांचेवर महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम कायदा कलमान्वये कायदेशीर कारवाई करुन पोलीस बंदोबस्तामध्ये २१ जुलै २०२५ रोजी सदर मिळकतीचा प्रत्यक्ष ताबा घेण्यात आला व सदर मिळकतीला कुलुप लावून सील करण्यात आले.

त्यानंतर संस्थेच्या कोणत्याही लेखी परवानगीशिवाय व कोणतीही माहिती न देता डॅनिअल पवार यांनी सदर मिळकतीचे सील व कुलुप तोडून मिळकतीमध्ये अनाधिकाराने प्रवेश केल्याची बाब ३० जुलै २०२५ रोजी पतसंस्थेच्या र्निदशनास आल्यानंतर पवार यांना वेळोवेळी मौखिक स्वरुपात सदर मिळकतीचा ताबा सोडण्यास सांगितले. परंतु त्याने अद्याप सदर मिळकतीचा ताबा सोडलेला नाही म्हणून आज लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!