पुणे जिल्ह्यातील पाणी टंचाईवर उपाय; 35 कोटींच्या पूरक कृती आराखड्याला मंजुरी, वीरधवल जगदाळे यांची माहिती..


पुणे : जिल्ह्यात संभाव्य पाणी टंचाईची तीव्रता लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी होणाऱ्या त्रासातून दिलासा देण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेने तब्बल ३५ कोटी ७४ लाख ९३ हजार रुपयांचा पूरक पाणी टंचाई कृती आराखडा तयार केला असून या आराखड्याला जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी मंजुरी दिली आहे.

या आराखड्याअंतर्गत पाणी टंचाई निवारणासाठी विविध उपाययोजना राबवण्यात येणार आहेत. यामध्ये नवीन विंधनविहिरी घेणे, नळपाणी पुरवठा योजनांची दुरुस्ती, टँकरद्वारे पाणीपुरवठा, खाजगी विहिरींचे अधिग्रहण, विहिरी खोल करणे तसेच पाण्याच्या स्त्रोतांचे बळकटीकरण यांसारख्या उपायांचा समावेश करण्यात आला आहे.

पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, याआधी ऑक्टोबर २०२५ ते मार्च २०२६ या कालावधीसाठी स्वतंत्र पाणी टंचाई कृती आराखडा तयार करण्यात आला होता. त्यानंतर आता एप्रिल ते जून २०२६ या कालावधीसाठी संभाव्य टंचाई लक्षात घेऊन त्रैमासिक पूरक आराखडा मंजूर करण्यात आला आहे.

नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांनंतर ग्रामीण भागातील नव्या सदस्यांनी पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नावर विशेष भर दिला होता. ग्रामीण भागात वाढणारी पाणीटंचाई लक्षात घेता अतिरिक्त निधीसह पूरक आराखडा तयार करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार हा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे मंजुरीसाठी सादर करण्यात आला होता.

दरम्यान, या आराखड्यात नवीन विंधनविहिरींसाठी १० कोटींपेक्षा अधिक निधी, नळपाणी योजनांच्या दुरुस्तीसाठी १२ कोटींहून अधिक तरतूद, तर पाण्याच्या स्त्रोतांच्या बळकटीकरणासाठी ७ कोटी २४ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच प्रगतीपथावरील नळपाणी योजना पूर्ण करण्यासाठी जवळपास १० कोटी रुपयांचा निधी राखून ठेवण्यात आला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!