पीएम किसानच्या २३ व्या हप्त्यापूर्वी सावधान! ‘या’ ३ चुका केल्या तर २ हजार रुपये अडकणार…

नवी दिल्ली : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या २३ व्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या लाखो शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना समोर आली आहे. केंद्र सरकारकडून लवकरच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात २ हजार रुपयांचा हप्ता जमा केला जाणार आहे. मात्र, कागदपत्रांतील चुका किंवा अपूर्ण पडताळणीमुळे अनेक शेतकऱ्यांचे पैसे अडकण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

सरकारच्या अलीकडील तपासणीत अनेक अर्जांमध्ये तांत्रिक त्रुटी, चुकीची माहिती आणि पडताळणीतील विसंगती आढळून आल्या आहेत. त्यामुळे अनेक लाभार्थ्यांचे हप्ते प्रलंबित राहिल्याचे समोर आले आहे.
यामुळे शेतकऱ्यांनी आपली माहिती तातडीने तपासून अपडेट करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पीएम किसान योजनेचा लाभ सुरू ठेवण्यासाठी ई-केवायसी प्रक्रिया आता अनिवार्य करण्यात आली आहे. फसवणूक रोखणे आणि निधी थेट पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवणे हा यामागचा उद्देश असल्याचे सांगण्यात आले आहे.

ज्या शेतकऱ्यांनी अद्याप बायोमेट्रिक किंवा ओटीपी आधारित ई-केवायसी पूर्ण केलेली नाही, त्यांनी त्वरित ही प्रक्रिया पूर्ण करावी. अन्यथा २३ वा हप्ता खात्यात जमा होण्यास विलंब होऊ शकतो.

याशिवाय केवळ ई-केवायसी पुरेसे नसून ‘लँड सीडिंग’ म्हणजेच जमिनीच्या कागदपत्रांची पडताळणी देखील आवश्यक आहे. अर्जातील जमीनविषयक माहिती आणि अधिकृत नोंदींमध्ये तफावत असल्यास अर्ज होल्डवर जाऊ शकतो.
शेतकरी जवळच्या सीएससी केंद्रावर किंवा अधिकृत पोर्टलवर जाऊन ई-केवायसी आणि जमीन पडताळणी प्रक्रिया पूर्ण करू शकतात. सरकारने शेतकऱ्यांना वेळेत माहिती अपडेट करून हप्ता अडकणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.