घरातून अचानक गायब झालेलं माय-लेकरू दुसऱ्या दिवशी विहिरीत मृतावस्थेत सापडलं; जामखेडमध्ये हळहळ


अहिल्यानगर : रविवारी घरातून अचानक बाहेर पडलेली २३ वर्षीय विवाहित महिला आणि तिचं दीड वर्षाचं लेकरू दुसऱ्याच दिवशी विहिरीत मृतावस्थेत आढळल्याने जामखेड तालुका हादरला आहे. माय-लेकराचा रात्रभर शोध सुरू होता, मात्र सोमवारी सकाळी समोर आलेल्या बातमीने संपूर्ण गाव सुन्न झाले. या हृदयद्रावक घटनेमुळे वंजारवाडी परिसरात शोककळा पसरली आहे.

मृत महिलेचे नाव साळू शिवाजी चौरे (वय २३) असे असून तिच्या दीड वर्षांच्या मुलाचे नाव विवांश शिवाजी चौरे असे आहे. दोघेही वंजारवाडी (ता. जामखेड) येथील रहिवासी होते. रविवारी (१० मे) साळू आणि तिचा मुलगा अचानक घरातून निघून गेले होते. बराच वेळ ते घरी परतले नाहीत, त्यामुळे कुटुंबीयांना चिंता वाटू लागली.

याप्रकरणी साळूचे नातेवाईक बिभीषण शंकर तांदळे यांनी खर्डा पोलिस ठाण्यात माहिती दिली. त्यांनी सांगितले की, माय-लेकराचा परिसरातील नातेवाईक, मित्रमंडळी आणि परिचितांकडे शोध घेण्यात आला. मात्र त्यांचा काहीच मागमूस लागला नाही. अखेर सोमवारी (११ मे) सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या दरम्यान धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

दत्तोबा किसन ढाळे यांच्या तरडगाव परिसरातील विहिरीत साळू आणि तिच्या चिमुरड्याचा मृतदेह आढळून आला. ही माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली. स्थानिकांच्या मदतीने दोघांना तातडीने बाहेर काढून जामखेड ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तेथील डॉक्टरांनी तपासणीअंती दोघांनाही मृत घोषित केले.

या घटनेनंतर वंजारवाडी आणि आसपासच्या परिसरात शोककळा पसरली आहे. दीड वर्षांच्या निष्पाप चिमुरड्यासह तरुण विवाहितेचा मृत्यू नेमका कसा झाला, याबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून घटनेमागील नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू केला आहे.

दरम्यान, या दुर्दैवी घटनेमुळे गावकऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त होत असून, माय-लेकराच्या निधनाने संपूर्ण परिसरात शोकमय वातावरण निर्माण झाले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!