भवानीनगर- भिगवण रोडवर स्पीड ब्रेकरची भयंकर अवस्था, खिळ्यांमुळे वाहनांचे टायर फुटून अपघात, प्रशासनाचे दुर्लक्ष…

भिगवण : येथील भिगवण- भवानीनगर या रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम मागील तीन ते चार वर्षांपासून सुरू आहे. भवानीनगर ते निंबोडीदरम्यान काही ठिकाणी काम अपूर्ण असले, तरी निंबोडी ते शेटफळगडेपर्यंतचे काँक्रिटीकरण पूर्ण झाले आहे. असे असताना अनेक ठिकाणी स्पीड ब्रेकरचे खिळे निघाल्याने टायर फुटून अपघात होत आहेत.

यामुळे मोठा धोका निर्माण झाला असून टायरचे देखील नुकसान होत आहे. यामुळे प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी तरुणांनी केली आहे. हा रोड वर्दळीचा रोड असून अनेक ठिकाणी रबरी गतिरोधक बसविण्यात आले होते. हे गतिरोधक बसविताना काँक्रीट रस्त्यावर लोखंडी खिळे ठोकण्यात आले होते.
असे असताना लाकडी आणि निरगुडे परिसरातील रबरी गतिरोधक निघून गेल्याने हे खिळे उघडे पडले आहेत. यामुळे धोका निर्माण झाला आहे. अनेक गाड्यांचे मोठे नुकसान झाले असून टायर फुटत असल्याने अपघात होत आहेत. यामुळे प्रशासनाने जर याकडे दुर्लक्ष केले तर तीव्र आंदोलन करणार असल्याचे वाहन नुकसानग्रस्त गणेश पवार, तुषार निंबाळकर आणि शिवम सपकळ यांनी सांगितले.

रस्त्यावरील उर्वरित रबरी गतिरोधक तातडीने हटवून काँक्रीटमध्ये ठोकलेले लोखंडी खिळे काढून टाकावेत, अशी मागणी वाहन चालक करत आहेत. याठिकाणी रोड चांगला असल्याने वाहनांचा वेग देखील जास्त आहे. यामुळे अचानक टायर फुटत असल्याने अनेकांचे मोठे नुकसान होत असून मोठा अपघात झाला तर जीवाला देखील धोका आहे.

तसेच गतिरोधकांमुळे अनेक वाहनांचे नुकसान झाले आहे, त्या वाहनमालकांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी गणेश पवार यांनी केली आहे. अनेक दिवसांपासून याबाबत मागणी केली तरी याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. यामुळे संताप व्यक्त केला जात आहे.