खासदार निलेश लंके यांची अचानक प्रकृती बिघडली! अहिल्यानगरवरून पुण्यात हलवलं, प्रकृतीबाबत समोर आली मोठी माहिती


अहमदनगर : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे खासदार निलेश लंके यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना पुढील उपचारांसाठी पुण्यात हलवण्यात येत आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून त्यांच्यावर अहिल्यानगरमध्ये उपचार सुरू होते. मात्र प्रकृतीत अपेक्षित सुधारणा न झाल्याने डॉक्टरांनी त्यांना पुण्यातील रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला.

मिळालेल्या माहितीनुसार, खासदार लंके यांना काही दिवसांपासून शारीरिक थकवा आणि अस्वस्थतेचा त्रास जाणवत होता. स्थानिक डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र प्रकृतीतील गुंतागुंत लक्षात घेता अधिक चांगल्या वैद्यकीय सुविधांसाठी त्यांना पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक येथे हलवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाच्या देखरेखीखाली त्यांना पुण्यात नेण्यात येत असून, त्यांच्या प्रकृतीची बातमी समोर आल्यानंतर अहमदनगरसह मतदारसंघात कार्यकर्ते आणि समर्थकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

निलेश लंके हे कार्यकर्त्यांमध्ये सतत सक्रिय राहणारे नेते म्हणून ओळखले जातात. मात्र प्रकृतीच्या कारणामुळे त्यांना काही काळ विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, रुग्णालयाकडून अद्याप अधिकृत वैद्यकीय बुलेटिन जाहीर करण्यात आलेले नसले तरी त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची प्राथमिक माहिती निकटवर्तीयांकडून मिळत आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!