दिलासादायक निर्णय! पेट्रोल-डिझेल आणि एलपीजी दर स्थिर, सर्वसामान्यांना मोठा दिलासा

सर्वसामान्यांच्या खिशाला थेट दिलासा देणारी मोठी अपडेट केंद्र सरकारकडून समोर आली आहे. देशात पेट्रोल, डिझेल आणि घरगुती एलपीजी गॅसच्या किमतींमध्ये कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. पेट्रोलियम मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की सध्या इंधनाचे दर स्थिर ठेवण्यात आले असून आगामी काळातही दर वाढवण्याचा कोणताही तातडीचा निर्णय घेण्यात आलेला नाही. यामुळे महागाईच्या काळात नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की देशात एलपीजीचा पुरवठा पूर्णपणे सुरळीत आहे आणि कुठलाही तुटवडा निर्माण झालेला नाही. जवळपास ९५ टक्क्यांहून अधिक घरगुती गॅस सिलेंडरचे वितरण ऑथेंटिकेशन कोडच्या माध्यमातून केले जात असून त्यामुळे वितरण प्रक्रियेत पारदर्शकता आणि अचूकता वाढली आहे. गेल्या काही दिवसांत तब्बल ८७ लाखांहून अधिक एलपीजी सिलेंडर यशस्वीरित्या ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यात आले आहेत.
याशिवाय व्यावसायिक आणि औद्योगिक एलपीजीचा पुरवठाही सुरळीत सुरू आहे. गेल्या ४८ तासांत सुमारे १५,९०० टन व्यावसायिक एलपीजीची विक्री झाली असून ८७६ टन ऑटो एलपीजीचा पुरवठा करण्यात आला आहे. छोट्या ग्राहकांसाठी ५ किलोचे सुमारे १,२०,००० सिलेंडर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यामुळे बाजारात मागणी आणि पुरवठा यामध्ये संतुलन राखले जात असल्याचे दिसून येत आहे.

शहरांमध्ये पीएनजी गॅस जोडण्या वाढवण्यावरही भर दिला जात आहे. अलीकडेच ६.३१ लाख नवीन जोडण्या कार्यान्वित करण्यात आल्या असून आणखी २.६७ लाख जोडण्यांची तयारी पूर्ण झाली आहे. सुमारे ६.९३ लाख ग्राहकांनी पीएनजीसाठी नोंदणी केली असून ४९,००० ग्राहकांनी आपली एलपीजी जोडणी परत केली आहे, अशी माहितीही देण्यात आली.

दुसरीकडे देशातील पेट्रोल-डिझेल विक्री केंद्रांवर परिस्थिती पूर्णपणे सामान्य आहे. पुरवठा साखळीत कोणताही मोठा अडथळा नाही. काही ठिकाणी नागरिकांकडून घाईघाईत बुकिंग झाल्यामुळे तात्पुरता ताण जाणवला असला तरी तो नियंत्रणात आहे. तेल शुद्धीकरण कंपन्यांकडे पुरेसा साठा असून उत्पादनही नियमित सुरू आहे.
दरम्यान, काही रिफायनरी देखभालीसाठी तात्पुरत्या बंद असून त्या लवकरच पुन्हा सुरू होणार आहेत. सरकारकडून वितरण व्यवस्थेवर देखील कडक नजर ठेवण्यात येत असून काही ठिकाणी तपासणी मोहीम राबवण्यात आली आहे. त्यामुळे इंधन पुरवठा आणि दर स्थिर ठेवण्यासाठी प्रशासन सक्रिय आहे.
या निर्णयामुळे पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीच्या किमती वाढण्याची भीती दूर झाली असून सर्वसामान्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे.