बीडमध्ये ‘लुटेरी नवरी’चा मोठा भंडाफोड; ८ लग्नांनंतर नवव्या आधीच पोलिसांनी घातला लगाम!

बीड : बीड जिल्ह्यात लग्नाच्या नावाखाली तरुणांना लुबाडणाऱ्या ‘लुटेरी नवरी’चा अखेर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. तब्बल आठ वेळा लग्न करून नवरदेवांना गंडा घालणारी ही महिला नवव्या लग्नाच्या तयारीत असतानाच पोलिसांच्या जाळ्यात अडकली. या घटनेमुळे जिल्ह्यात चांगलीच खळबळ उडाली असून अनेक फसवणूकग्रस्त पुढे येत आहेत.

उमापूर येथील योगेश शिंदे हा तरुण लग्नासाठी वधूच्या शोधात होता. ग्रामीण भागात मुलींचे प्रमाण कमी असल्याने त्याला अडचणी येत होत्या. याचाच फायदा घेत काही एजंट त्याच्यापर्यंत पोहोचले. “चांगलं स्थळ आहे” म्हणत त्यांनी त्याचा विश्वास जिंकला आणि लग्नासाठी लाखो रुपयांची मागणी केली. घरच्यांनीही आनंदात रक्कम दिली आणि लग्न थाटामाटात पार पडलं.
पण लग्नानंतर काहीच दिवसात नवरीने आपला खरा रंग दाखवला. घरातील दागिने आणि रोख रक्कम घेऊन ती गायब झाली. योगेशने शोध घेतल्यावर धक्कादायक माहिती समोर आली. हीच महिला याआधी सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा आणि इतर भागात अशाच प्रकारे आठ वेळा लग्न करून फसवणूक करत होती. प्रत्येक वेळी काही दिवस सासरी राहून संधी साधत ती पोबारा करत असे.

या प्रकारामुळे योगेश पूर्णपणे खचला असून त्याने बीडच्या पोलीस अधीक्षकांकडे तक्रार दिली आहे. “माझी लाखो रुपयांची फसवणूक झाली, आयुष्य उद्ध्वस्त झालं,” अशी वेदना त्याने व्यक्त केली. न्याय न मिळाल्यास टोकाचं पाऊल उचलण्याचा इशाराही त्याने दिला आहे.

दरम्यान, ही टोळी ग्रामीण भागातील लग्नाळू तरुणांना टार्गेट करत असल्याचं समोर आलं आहे. एजंट स्वतःला नातेवाईक म्हणून ओळख देतात, मुलीच्या अडचणी सांगून ३ ते ५ लाख रुपये उकळतात आणि लग्नानंतर नवरी काही दिवसातच गायब होते.
या प्रकरणी चकलांबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून टोळीत आणखी किती जण आहेत याचा तपास सुरू आहे. पोलिसांनी नागरिकांना सावध राहण्याचं आवाहन केलं आहे.