विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी कडक पाऊल; छत्रपती संभाजीनगरमध्ये स्कूल बससाठी CCTV, GPS अनिवार्य

छत्रपती संभाजीनगर : विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेत छत्रपती संभाजीनगरमध्ये स्कूल बस नियम अधिक कडक करण्यात आले आहेत. गेल्या काही वर्षांत राज्यात आणि देशभरात स्कूल बसमधील निष्काळजीपणा, चालकांची बेपर्वाई, तसेच काही ठिकाणी विद्यार्थ्यांशी गैरवर्तनाच्या घटना समोर आल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. काही प्रकरणांत बसचा मागोवा लागत नसणे, अपघातानंतर उशिरा मदत पोहोचणे, तसेच लहान मुलांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले होते. याच पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने शहरातील सर्व स्कूल बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे, जीपीएस प्रणाली आणि पॅनिक बटण अनिवार्य केले असून, या नियमांची अंमलबजावणी १ जूनपासून केली जाणार आहे. जिल्हा स्कूल बस सुरक्षितता समितीच्या १२ फेब्रुवारी रोजी झालेल्या बैठकीत विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी विविध सूचना करण्यात आल्या होत्या. त्यानंतर या सूचनांना अंतिम स्वरूप देत आदेश जारी करण्यात आले.
नव्या नियमांनुसार प्रत्येक बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे आवश्यक राहणार आहे, जेणेकरून बसमधील हालचालींवर लक्ष ठेवता येईल. जीपीएस प्रणालीमुळे बसचे लोकेशन रिअल-टाइममध्ये ट्रॅक करता येणार आहे. आपत्कालीन परिस्थितीत विद्यार्थ्यांना त्वरित मदत मिळावी यासाठी पॅनिक बटणही बसमध्ये कार्यान्वित ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे.

तसेच सहा वर्षांखालील मुलांची ने-आण करणाऱ्या बसमध्ये आणि मुली असलेल्या शाळांमध्ये महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणेही आवश्यक करण्यात आले आहे. या नियमांचे उल्लंघन केल्यास कडक कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.

पहिल्या उल्लंघनासाठी ३० दिवस परवाना निलंबित, दुसऱ्या उल्लंघनासाठी ६० दिवस निलंबन आणि तिसऱ्या उल्लंघनानंतर बसचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्याचा प्रस्ताव प्राधिकरणाकडे पाठवण्यात येणार आहे.
प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काठोळे यांनी स्पष्ट केले की, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही. नियमांची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांना कोणतीही गैरसोय झाल्यास संबंधित शाळा प्रशासन आणि बस कंत्राटदार जबाबदार धरले जातील.
या निर्णयामुळे पालकांमध्ये समाधान व्यक्त होत असून, विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी हे पाऊल अत्यंत महत्त्वाचे ठरणार असल्याचे मत व्यक्त होत आहे.